पूजाने चांगलेच सुनावले

Pooja Sawant

सध्या सेलिब्रिटी कलाकारांसाठी सोशल मीडिया पेज हे त्यांच्या रुटीन फोटोपासून ते नव्या सिनेमा किंवा मालिकांमधील खास लूकचं प्रमोशन करण्यासाठी चांगलंच प्रभावी माध्यम बनले आहे. इतकेच नव्हे तर , कुठे ट्रिपला गेल्यानंतरचे असतील किंवा आपल्या कुटुंबीयांसोबतचे फोटो कलाकार शेअर करत असतात. अनेक कलाकार विविध कंपन्यांसाठी पेड फोटोसेशनही करतात. काही सेलिब्रिटी कपड्यांच्या ब्रँडसाठी तसेच मेकअप कॉस्मेटिक ब्रँडसाठी फोटो सेशन करतात. मग त्या लूकमधील फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा मोह त्यांना आवरत नाही. पण अनेकदा अशा खास फोटोसेशनसाठी घालण्यात आलेले ड्रेस हे थोडे बोल्ड असतात.अशावेळी या कलाकारांना त्यांच्या चाहत्यांकडून ट्रोल केले जाते. असे कपडे घालू नका, अशा पोझ देऊ नका असेही काही नेटकरी कमेंटमधून सांगत असतात.

अनेक कलाकार त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र काही फॉलोअर्स नको त्या कमेंट देत असतात आणि त्याचा सेलिब्रिटी कलाकारांना नक्कीच त्रास होत असतो. अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिने हाच त्रास कमेंटवरच्या प्रत्युत्तरमधून व्यक्त केला आहे. आम्ही काय कपडे घालतो किंवा कसे फोटो काढतो याबद्दल कुणी आम्हाला बोलू नये. कुठल्या प्रसंगी काय घालावे आणि ते कसे प्रेझेंट करावे याबाबतचे भान आम्हाला नक्कीच आहे अशा शब्दात पूजाने अनेक नेटकऱ्यांना कलाकारांच्या मनातलं उत्तर दिले आहे.

काही दिवसांपासून कलाकारांच्या सोशल मीडिया पेजवर त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोवरुन अनेकदा नेटकरी , चाहते कलाकारांना ट्रोल करत असतात. अनेकदा कलाकार जे फोटो पोस्ट करतात ते त्यांच्या आगामी सिनेमातील लूकचे फोटो असतात. काही कलाकार त्यांच्या दैनंदिन जीवनातील काही क्षण टिपून तेदेखील आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असतात. याच मुद्यावरून पूजा सावंतने तिच्या चाहत्यांना काही गोष्टी थोड्या कडक शब्दातच सुनावल्या. सध्या पूजाच्या सोशल मीडिया पेजवरील हटके फोटो इतकीच तिची ही कडक शब्दांमधील पोस्टदेखील व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कलाकारांना अशाप्रकारे ट्रोल करण्याचे प्रमाण वाढत आहे.

त्याचा कलाकारांना मानसिक त्रासही होत असल्याचे ते नेहमी सांगतात. गेल्याच महिन्यात अभिनेता संतोष जुवेकर याने त्याच्या क्लीनशेव्ह लूकमधील एक फोटो पोस्ट केला होता. विशेष म्हणजे या फोटोमध्ये त्याने त्याची मिशीदेखील काढली होती. या फोटोवरून त्याला काही नेटकऱ्यांनी,” या फोटोत तू छक्क्यासारखा दिसतो अशी कमेंट दिली होती. या कमेंटवरही संतोषने सडेतोड उत्तर देत, तुम्ही ज्यांना छक्का म्हणता त्यांचे जीवन जगायला खरच हिम्मत लागते आणि ती हिम्मत त्यांच्याकडे आहे. त्यांच्या नावाची उपमा मला या फोटोसाठी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद असा शालूतून जोडा मारत त्याच्या फॉलोअर्सचा समाचार घेतला होता.

सध्या पूजा सावंत हिनेही अशाच पद्धतीने चुकीच्या कमेंट करणाऱ्या किंवा वाईट हेतूने कमेंट करणाऱ्या चाहत्यांना खडे बोल सुनावले आहेत. पूजा सावंत सांगते की, आम्हा कलाकारांना चाहत्यांचं प्रेम हवं असतं. आम्ही नवीन काय करत आहोत, नव्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये सध्या व्यस्त आहोत हे आम्हाला आमच्या चाहत्यांशी शेअर करायला नक्कीच आवडत. अर्थात हा आमच्या प्रमोशनचा भाग असला तरी शेवटी आमच्या प्रत्येक भूमिकेला आमच्या चाहत्यांकडून मिळणारा प्रतिसाद हीच आमची पावती असते. त्यासाठी सध्या सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम आमच्याकडे आहे. त्यामुळे चांगले फोटो शेअर करावे असे जर आम्हाला वाटले तर त्यात आमची काय चूक आहे? सध्या अनेक कलाकार हे त्यांच्या सिनेमा मालिका याव्यतिरिक्त काही ब्रँडसाठी जाहिरात करत असतात आणि त्याकरिता असे बोल्ड फोटोसेशन करावे लागत असते.

त्यासाठी घातलेले कपडे सुद्धा अनेकदा शॉर्ट असतात हे मला मान्य आहे पण त्यामध्ये आम्ही कुठेही चुकीच्या पद्धतीने स्वतःला सादर करत नाही.कारण तेवढी जाणीव व भान आम्हाला असतं. परंतु अनेकदा काही चाहते हे समजून न घेता सोशल मीडिया पेजवर जाहीरपणे अत्यंत चुकीच्या शब्दांमध्ये कमेंट करत असतात. अशा चाहत्यांना, प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की,प्रत्येक कलाकार जरी काम म्हणून, त्यांचा व्यवसाय म्हणून ऑनस्क्रीन कुठल्याही पद्धतीचे कपडे घालत असले तरी तो त्यांच्या कामाचा आणि त्या भूमिकेच्या गरजेचा भाग असतो. असे कपडे आम्ही मालिकेत किंवा सिनेमांमध्ये घालतो याचा अर्थ मी कायम तशाच पद्धतीने समाजामध्ये वावरत नसते हे देखील आमच्या चाहत्यांनी समजून घेतले पाहिजे. जेव्हा चाहत्यांकडून अशा पद्धतीच्या कमेंट येतात तेव्हा असे फोटो डिलिट न करता त्यांना उत्तर देण्याची तयारी कलाकरांनीही दाखवली पाहिजे असंही पूजा म्हणते.

पूजा सावंत ही मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये सध्या काम करत असून तिला नृत्याची आवड आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजाने रूपेरी दुनियेत पदार्पण केले. तिची दगडी चाळ, नीळकंठ मास्तर ,भेटली तू पुन्हा या सिनेमातील भूमिका अनेक चाहत्यांना आवडल्या होत्या. शिवाय ती काही दागिन्यांच्या ब्रँडसाठी जाहिरात करत असते. जंगली या सिनेमात तिने नायिकेची भूमिका केली होती आणि तिच्या भूमिकेला बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी दाद दिली आहे. सध्या ती डान्सवर आधारित रियालिटी शोचं परीक्षण करत असून तिचा हा अंदाज तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या चाहत्यांना आवडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER