पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील ; शिवसेना नेत्याची सावध भूमिका

deepak kesarkar

सिंधुदुर्ग : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणावर शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि माजी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संवेदनशील आहेत. पण केवळ आरोपावरून कुणावरही कारवाई करणं चुकीचं आहे, असेही केसकर म्हणाले . केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला .

पूजा चव्हाण प्रकरणात विरोधी पक्षाने राजकारण करू नये. हा प्रश्न राजकीय नाही. एका महिलेच्या न्यायाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: याप्रकरणी संवेदनशील आहेत. त्यांनी या प्रकरणाची माहिती मागवली आहे. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा, असे केसरकर म्हणाले. केवळ आरोपावरून एखाद्यावर कारवाई करणं चुकीचं आहे. अशी कारवाई करणं घाईचंही ठरेल. या प्रकरणात काही तथ्य आढळल्यास स्वत: मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील, असेही ते म्हणाले .

दरम्यान, संजय राठोड यांच्या प्रकरणामुळे शिवसेनेची प्रचंड कोंडी झाली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्यांना प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत. त्यातच राठोड यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यांची बाजू मांडलेली नाही. त्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी हा शिवसेना नेत्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मीडियासमोर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशी तंबीच शिवसेनेकडून नेत्यांना देण्यात आली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER