…आणि पूजा चव्हाणच्या वडिलांना रडू कोसळले

pooja-chavan-news

बीड: टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तिचे वडील लहू चव्हाण आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आणि मुलीच्या आठवणीने व्याकुळ झालेला हा बाप ढसढसा रडला.  पूजाच्या आत्महत्येवरून विनाकारण आमची बदनामी केली जात आहे. आमची ही बदनामी त्वरीत थांबवा. आम्हाला चार दिवस जगू द्या, नाही तर मी आत्महत्या करेन, असे लहू चव्हाण म्हणाले. आपले मन मोकळे करताना त्यांनी माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी करू नका असे सांगत माध्यमांच्या प्रतिनिधींना हात जोडले. या प्रकरणात आमची बदनामी करू नका. आमचे अर्धे कपडे काढलेच आहेत. आता पूर्ण कपडे काढू नका. कृपा करा, आता आणखी बदनामी करू नका, अशी हातजोडून विनंती करतानाच तुम्ही आणखी बदनामी केली तर मी आत्महत्या करेन असा आक्रोशच त्यांनी केला.
राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे पूजा च्या आत्महत्येची कनेक्शन असल्याचे गेले काही दिवस माध्यमांमधून सातत्याने पुढे येत आहे. लहू चव्हाण म्हणाले की माझी मुलगी खूप चांगली होती. लोकं उगाच तिची बदनामी करत आहेत. राजकारणाच्या दबावाखाली मी बोलत आहे का असंही विचारलं जात आहे. पण माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी पुण्याला गेलो होतो. तिथे विचारपूस केली. त्यावेळी पूजा गॅलरीत बसली होती. दीड वाजता ती खाली पडली. चक्कर येत असल्याचं ती सांगत होती, असं तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मित्राने सांगितलं. सांगा आता मी कुणावर आरोप करू? असा सवाल त्यांनी केला.

संजय राठोड यांचे  पूजा चव्हाण संदर्भात  जे काही कनेक्शन ऑडिओ क्लिपच्या निमित्ताने पुढे येत आहे  त्याला लहू चव्हाण यांनी  आजच्या निवेदनात फाटा देण्याचा प्रयत्न केला.  ते कोणाच्या तरी दबावाखाली निवेदन करीत असल्याचे जाणवले. पूजाने  कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असावी  असे  संकेत त्यांनी दिले. पूजाने पोल्ट्री व्यवसायासाठी 25 ते 30 लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण लॉकडाऊनमुळे धंद्यात खोट आल्याने ती टेन्शनमध्ये होती, असे ते म्हणाले.  माझं चांगलं व्हावं म्हणून तिने तिच्या नावावर कर्ज घेतलं होतं. तिला पोल्ट्री काढायची होती. आम्ही बांधकाम केलं. बॅच टाकला. पण कोरोना आल्यामुळे आम्ही सर्वांना कोंबड्या फुकट वाटल्या. पोल्ट्रीतून आम्हाला एक रुपयाही आला नाही. सरकारला मदतीसाठी अर्ज दिला. मदतही मिळाली नाही. नंतर बर्ड फ्लू आला. त्यातही नुकसान झालं. त्यामुळे तिच्यावर संकट उभं राहिलं होतं. तेव्हा मी तिला बेटा घाबरू नको, माझी 25 लाखाची एलआयसी आहे. त्यावरून लोन घेऊ म्हणून सांगितलं. एलआयसीवर मला चार-पाच लाखाचं लोनही मिळालं. त्यानंतर एक दिवस पूजा म्हणाली गावाकडे मन लागत नाही. पुण्याला जाते. जाताना मी तिला 25 हजार रुपये खर्चाला दिले होते, असं त्यांनी सांगितलं. तिच्यावर कर्जाचा ताण होता. हप्ते भरण्याचं टेन्शन होतं, असंही ते म्हणाले.

दुर्घटनेच्या दिवशी रात्री 2 वाजता मला तिच्या मित्राचा फोन आला. तिच्या डोक्याला मार लागल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे मी क्षणाचा विचार न करता त्याचवेळी पुण्याचा रस्ता धरला. सकाळी साडे आठ – नऊच्या सुमारास पुण्यात आलो. तेव्हा तिचा मृतदेहच दिसला. तिचा मृतदेह पाहून मला चक्कर आल्यासारखं झालं, असं सांगताना चव्हाण यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.