
नुकताच व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) होऊन गेला आहे. एकमेकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा हा दिवस प्रेम विश्वात साजरा झाला. या दिवशी सोशल मीडिया वर्तुळात एका संवादाची जोरदार चर्चा सुरू होती. तो संवाद होता अभिनेता गश्मीर महाजन (Gashmir Mahajan) आणि अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) या दोघांच्या चॅटिंगमधला. “उद्या काय करतेस? काय प्लान आहे? या गश्मीर च्या प्रश्नावर पूजा कडून, “काहीच नाही” असं आलेले उत्तर… आणि त्यावर “मग उद्या भेट मला, तुझ्यासाठी सरप्राईज आहे” असं गश्मीरच म्हणणं आणि शेवटी दोघांचेही “आय लव यू” हे शब्द . हा संवाद जोरदार व्हायरल झाला आणि पूजा आणि गश्मीर यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चेला उधाण आलं. पण खरोखरच गश्मीर आणि पूजा लवकरच एकमेकांना आय लव यू असं म्हणणार आहेत. अर्थात खऱ्या आयुष्यात नाही तर त्यांच्या नव्या सिनेमात. ते मित्र आणि मैत्रिण यांच्यातील निखळ नात्याचं दर्शन घडवत लव यू मित्रा असे म्हणणार आहेत .
एखाद्या नव्या सिनेमाचं ,नाटकाचं किंवा मालिकेचं प्रमोशन हटके पद्धतीने कसा करता येईल यासाठी अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात. सिनेमाविषयी काहीही न सांगता त्यातल्या कलाकारांकडून एखादी अशी पोस्ट केली जाते की ज्याचा संबंध हा सिनेमाच्या कथेशी किंवा त्यातल्या एखाद्या व्यक्तिरेखेशी असतो. यामुळे त्यांच्या येऊ घातलेल्या सिनेमाची चर्चा होते आणि मग त्यानंतर प्रमोशनसाठी हा सगळा प्रपंच मांडला होता हे चाहत्यांना कळतं. अशा पद्धतीच्या प्रमोशनचे फंडे यापूर्वीही वापरण्यात आले आहेत. लवकरच पूजा सावंत आणि गश्मीर महाजन यांचा लव यू मित्रा हा सिनेमा झळकणार आहे आणि याच सिनेमाच्या हटके प्रमोशनसाठी या दोघांचे आय लव यू असं म्हणत असलेला चॅटिंग व्हायरल करत या सिनेमाची हवा करण्यात आली. अर्थात गश्मीर आणि पूजा या दोघांनीही हा प्रमोशन फंडा चांगलाच एन्जॉय केला.
गश्मीर आणि पूजा हे या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे ही दोघंही या नव्या सिनेमासाठी उत्सुक आहेत. यापूर्वी बोनस या सिनेमात पूजा आणि गश्मीर यांची केमिस्ट्री जुळून आली आहे. पुन्हा एकदा ही जोडी एकत्र येत मैत्रीचा वेगळा अर्थ उलगडणार आहेत.
गश्मीर सांगतो की,आपल्या आयुष्यामध्ये असा एक मित्र किंवा एक मैत्रीण असणं खूप गरजेचे आहे की ज्यामध्ये इतर कुठलीही भावना नसून त्यामध्ये फक्त मैत्रीची भावना असली पाहिजे. एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात फक्त मैत्री असू शकत नाही असं अनेकदा म्हटलं जातं पण जगात अशीही मैत्री असते जी शारीरीक आकर्षण, प्रेम या पलीकडे एक निस्वार्थपणा जपत असते. हीच या सिनेमाची संकल्पना आहे. आतापर्यंत मैत्रीवर खूप सिनेमे आले पण त्यामध्ये दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी यांच्यातील मैत्री दाखवली होती. पण या सिनेमात एक मुलगा आणि मुलगी किती चांगले मित्र असू शकतात हे दाखवण्यात येणार आहे.
पूजा सावंत सांगते की अनेकदा मुला-मुलींच्या मैत्रीकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आपल्या आजूबाजूलाही अशा अनेक मित्र मैत्रिणी असतात ज्यांची मैत्री त्यांचे कुटुंबीय सुद्धा स्वीकारत नाही. समाजाकडूनही अशा मैत्रीकडे वेगळ्या चष्म्यातून पाहिले जाते. एखाद्या मुलीच्या आयुष्यात चांगला मित्र असणं आणि एखाद्या मुलाच्या आयुष्यात त्याची एक चांगली मैत्रीण असणे हे एक वेगळंच नातं आहे. अशा पद्धतीची मैत्री एक परिपक्व नातं निर्माण करत असते. अशा सिनेमाचा भाग बनत असताना वैयक्तिकदृष्ट्या माणूस म्हणून समृद्ध होण्याची संधी मला मिळाली.
गश्मीर आणि पूजा यांची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत. कॅरी ऑन मराठा या सिनेमातून गश्मीरचे मराठी सिनेमात पदार्पण झालं. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजन यांचा मुलगा या पलीकडे जात गश्मीरने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. तो उत्तम अभिनेता आहेच पण शिवाय तो चांगला कोरिओग्राफरही आहे. सध्या तो इमली या हिंदी मालिकेत काम करत असून आजपर्यंत त्याने बोनस, मला काहीच प्रॉब्लेम नाही, देऊळ बंद यासारख्या अनेक सिनेमात काम केले आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकलेली पूजा सावंत सध्या डान्सवर बेतलेल्या एका रियालिटी शोची परीक्षक म्हणून तिच्या चाहत्यांना दर्शन देत आहे. उत्तम नृत्यांगना अशीही पूजाची ओळख आहे. दगडीचाळ, भेटली तू पुन्हा या सिनेमातील तिचा अभिनय तिच्या चाहत्यांना आवडला होता. जंगली या सिनेमातील महिला माहूत या भूमिकेत पूजाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
मोजकं आणि नेमकं काम करणारे हे दोघेही कलाकार एक नवा विषय घेऊन मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. सिनेमासाठी केलेल्या प्रमोशन फंडा यामुळे काही वेळ या दोघांमध्ये काहीतरी गोड नातं फुलत असल्याची चर्चा झाली खरी पण हे सगळं सिनेमाच्या प्रमोशनसाठी होतं हे समजल्यानंतर आता या दोघांच्या चाहत्यांचे लक्ष त्यांच्या नव्या सिनेमाकडे लागलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला