स्वरभास्कर पुरस्काराचं राजकारण

Shailendra Paranjapeपुणे शहराचा लौकिक विविध क्षेत्रांमधे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. साहित्य, संस्कृती, क्रीडा, शिक्षण, राजकारण, युद्धशास्त्र, मुत्सद्देगिरी, प्रशासकीय सेवा, विज्ञान-तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात मोलाचं योगदान दिलेले महनीय लोक पुण्यात होऊन गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्याही आधी गेल्या शतकात तर पुणे शहरात बसमधून एखादा दगड भिरकावला तर तो चार विद्वानांना लागून मग जमिनीवर पडेल, असं गमतीने सांगितलं जायचं. अर्थात, काळ बदलला तसतसा हा लौकिक बदलत गेला. सुविद्ध, सुसंस्कृत पुणे शहर टेक सँव्ही होत गेलं. संगणक-तंत्रज्ञान, खगोलविज्ञान, पेशीविज्ञनासाह विविध आंतरविद्याशाखीय विषयांतल्या संशोधन संस्था पुण्यात असल्याने विचारवंतांचं, शिक्षणतज्ज्ञांचं, शिक्षणसंस्थाचं पुणं आयटी शहर झालं, अटोमोबाईल शहर झालं. आता स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनाचं शहर म्हणूनही पुणं उदयास आलं आहे.

सामान्यतः थोरामोठ्यांच्या स्मृती जागवणं, त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे व्याख्यान, कार्यक्रम सादर करणं, असे उपक्रम करणाऱ्या संस्था पुण्यामधे मोठ्या संख्येने आहेत. सव्वाशे वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेसारखे उपक्रम आहेत आणि तितकाच जुना सार्वजनिक गणेशोत्सवही आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या काळातल्या समाजधुरिणांचे स्मरण विविध प्रसंगी केले जाते.

हे सारे करणाऱ्या त्या त्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्था असताना राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था हेही आपापल्या परीने असे उपक्रम करतात. ते करताना समाजासमोर काही आदर्श रहावेत, असाच त्यंचाही हेतू असतो. पण सरकारी पातळीवर अनास्थेमुळे, क्वचित प्रसंगी सरकारी अनागोंदीमुळे किंवा अन्य काही कारणाने अशा कार्यक्रमांच्या आयोजनात गडबड झाली तर सरकारीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागते. पुण्यामधे येऊन जागतिक पातळीवर ख्यातकीर्त झालेले शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या नावानं दिल्या गेलेल्या आणि अचानक बंद करण्यात आलेला पुरस्कार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आलीय. पंडितजींच्या स्मरणार्थ पुणे महापालिकेने २०११ पासून स्वरभास्कर पुरस्कार द्यायला सुरुवात केली. पण गेली चार वर्षे हा पुरस्कार दिला गेलेला नाही.

महापालिकेने पुरस्कारांवर पैसा खर्ची घालू नये, अशा प्रकारचे निर्देश राज्य सरकारने जारी केल्यानंतर हा पुरस्कार दिला गेलेला नाही. यंदा २०२१ मधे ४ फेब्रुवारीपासून पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे पालिकेने हा पुरस्कार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी कॉँग्रसेचे महापालिकेतले गटनेते आबा बागूल यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. पालिकेने ही मागणी मान्य न केल्यास आपण आपल्या नवरात्र महोत्सवात पंडितजींच्या नावानं हा पुरस्कार देऊ, अशी भूमिकाही बागूल यांनी घेतली आहे.

पालिकेने बागूल यांची मागणी अमान्य केल्यास बागूल यांना हा पुरस्कार त्यांच्या नवरात्र महोत्सवात देणं शक्यही आहे. पण तसं झाल्यास त्याचं भांडवल आगामी महापालिका निवडणुकीत नक्कीच केलं जाईल. त्यामुळे महापालिकेत सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत टीकेलाही कदाचित सामोरे जावे लागेल. त्यामुळे थोरामोठ्यांच्या जयंती-पुण्यतिथीवरून होणारे वद वादंग आणि पुरस्कारांसारख्या वास्तविक समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमधून अनवस्था प्रसंगही उद्भवू शकतात, हेच नव्याने समोर आले आहे.

पंडित भीमसेन जोशी (Bhimsen Joshi)यांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार मुळात अखंडितपणे सुरू रहायला हवा होता. पण सरकारी कारभारात निघणारी परिपत्रके, अध्यादेश यांना मानवी चेहरा नसल्याने आणि पुरस्कार, जयंती, पुण्यतिथीचाही राजकीय हेतूने उपयोग करून घेण्याची पद्धत सुरू झाल्याने ही स्थिती आलेली आहे. भारतरत्न असोत की साऱ्या जगाला पसायदान देणारे ज्ञानोबा-तुकोबा आणि स्वराज्याचे प्रेरणास्त्रोत असलेले शिवराय, राजकारणासाठी त्यांची नावं घेणं आधी बंद व्हायला हवं.
शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER