खडसेंचे भाजपमधील राजकारण संपले, तावडे वाचले, पंकजाचे जमले

Vinod Tawde- Eknath Khadse-Pankaja Munde.jpg

भाजपसारख्या (BJP) पक्षात कितीही वाईट दिवस आले तरी संयम बाळगायचा असतो हे कोणी शिकावे तर विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडून. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा साधा कार्यकर्ता ते प्रदेश भाजपचा सरचिटणीस, राज्यात पॉवरफुल मंत्री आणि राजकीय कारकिर्द बहरत आहे असे वाटत असतानाच विधानसभेची कापली गेलेली उमेदवारी, त्यानंतर राज्यसभा किंवा विधान परिषदेवरही न मिळालेली संधी या सगळ्या गोष्टींमुळे तावडे पार साईडलाईन झाले होते.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रदेश कार्यकारिणीतदेखील त्यांना महत्त्वाचे पद मिळाले नाही. त्यामुळे आता तावडेंना काहीही मिळणार नाही असे वाटत असतानाच आता ते पक्षाचे राष्ट्रीय सचिव झाले आहेत.

एकनाथ खडसेंपासून (Eknath Khadse) अनेक नेत्यांनी तावडेंपासून संयम शिकण्यासारखा आहे. मंत्रीपद गेले, आमदारकीचे तिकीटही मिळाले नाही, पुढे विधान परिषद, राज्यसभाही मिळाली नाही हे सगळे जसे तावडेंबाबत घडले तसेच ते खडसेंबाबतदेखील घडले पण खडसेंनी हल्लाबोल केला. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते तुटून पडले, एकेरीत बोलले. मंत्रीपद गेले तेव्हाच हे सगळं बोलले असते तर खडसेंच्या बोलण्यात दम आहे असे लोकांना वाटले असते पण त्यावेळी झालेल्या आरोपांनी ते बॅकफूटवर गेले आणि गरज नव्हती तेव्हा बोलते झाले, खडसेंचे टायमिंग चुकले.

विनोद तावडे यांचे राजकारण संपले असे मानले जात असताना ते राष्ट्रीय राजकारणात जात आहेत. ते पुरते चाणाक्ष आहेत. आठ-दह महिने अन्याय होऊनही ते शांत राहिले, कुठेही ‘लूज टॉक’ केले नाही. आता ते केंद्रात मिळालेल्या संधीचे बरोबर सोने करतील. केंद्रातील भाजपच्या नेत्यांशी जवळीक वाढवतील. दुसरीकडे पक्षात न्युसन्स व्हॅल्यू दाखविले  तर त्याचा दबाव येईल आणि आपल्याशी जुळवून घेतले जाईल, असे खडसेंना वाटले असावे. नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा ज्या पक्षाचे शीर्षस्थ नेते आहेत त्या पक्षात खडसेंनी असा होरा बांधणे चुकीचे होते. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतदेखील खडसेंना स्थान मिळाले नाही. त्यांचा बोलघेवडेपणा आडवा आला.एक काळ असा होता की गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, खडसे असे मोजकेच बहुजन नेते भाजपकडे होते, आज त्यांची रांग आहे. केवळ ओबीसी आहे म्हणून एखाद्या नेत्यांचे कसेही वागणे सहन केले जाईल अशी स्थिती आज राहिलेली नाही. एकेकाळी मुंडेंचे रुसवेफुगवे भाजपने सांभाळले आज त्याची गरज राहिलेली नाही. नव्या दमाच्या नेत्यांची फौज संधीची वाट पाहत आहे. जुन्यांना ते कसेही वागले तरी डोक्यावर घेत नाचण्याचे दिवस आता संपले आहेत.

पंकजा मुंडे यांनीही विधानसभेतील पराभव, विधान परिषद, राज्यसभेत संधी न मिळाल्यानंतर थोडी तणतण केली होतीच पण पक्षात आक्रस्ताळेपणा खपवून घेतला जाणार नाही याचा वेळीच अंदाज त्यांनी घेतला. आपल्याला आजही पक्षात भविष्य आहे, आपल्या कुटुंबाची नाळ भाजपशी जुळलेली आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला समोर जायचे आहे याचे भान त्यांनी ठेवले. त्यामुळेच पराभवानंतर राजकीय जीवनात आलेले रितेपण आज राष्ट्रीय सचिवपदाची संधी मिळाल्याने संपणार आहे. पंकजा यांच्या ठायी क्षमता आहे. त्यांना महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी मिळाली असती तर ते अधिक न्याय देणारे ठरले असते. लहान बहीण प्रीतम, मामेबहीण पूनम या खासदार आहेत आणि आपण मोठ्या असूनही आपल्या राजकीय जीवनात पोकळी आहे ही सल त्यांना असणारच. नव्या नियुक्तीने ही सलही दूर व्हावी.

भाजप हा केंद्रातील सत्तारुढ पक्ष आहे. अनेक राज्यांमध्ये पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीला अतिशय महत्त्व आहे. अशा महत्त्वाच्या कार्यकारिणीत महाराष्ट्राच्या वाट्याला एकही सरचिटणीसपद वा उपाध्यक्षपद आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत भरघोस यश दिले, विधानसभा निवडणुकी सर्वाधिक जागा जिंकून दिल्या तरी महाराष्ट्रावर अन्याय झाला. मात्र, त्याची दुसरी बाजूही बघितली पाहिजे. राष्ट्रीय उपाध्यक्ष वा सरचिटणीस होण्यासाठीचे कॅलिबर असलेल्या नेत्यांची महाराष्ट्रात उणिव आहे का याचे आत्मचिंतन करण्याचीही आवश्यकता आहे. राष्ट्रीय राजकारणात दबदबा असलेले नेतृत्व प्रदेश भाजपला जाणीवपूर्वक तयार करावे लागेल. मराठी सिनेमाचा हीरो हिंदी सिनेमात साईडरोल करतो; तसे होता कामा नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER