राजकारण श्रद्धांजलीचे अन् कंगनावरील कारवाईचेही?

uddhav kangana raut
uddhav kangana raut

श्रद्धांजलीपर भाषणे ही राजकीय कुरघोडी करण्याची जागा नसते याचे भान सत्ताधारकांनी सोमवारी विधानसभेत बाळगले नाही. भारतरत्न प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आदी मान्यवर दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यासाठीचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचे नेते म्हणून विधानसभेत मांडला. त्यावेळी बोलताना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणवदांना पाठिंबा दिला होता.

त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपण्याच्या काही दिवस आधी ते मुंबईत आले तेव्हा त्यांनी मला राजभवनवर भेटीसाठी बोलावून घेतले आणि बाळासाहेबांमुळे मी राष्ट्रपती होऊ शकलो आणि ते ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुला इथे बोलावले अशी भावना व्यक्त केली.हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण रात गयी बात गयी, खुर्ची मिळाली की विचारत नाहीत, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी भाजपला काढल्याचे स्पष्टपणे जाणवले. राजकीय चिमटे काढण्याच्या जागा अनेक आहेत, श्रद्धांजलीपर भाषण देताना त्याचा मोह आवरायला हवा. निदान मुख्यमंत्र्यांनी तरी तो आवरायला हवा. विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपनेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असे या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.

मुख्यमंत्र्यांनंतर लगेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलले. त्यांनी कोणतेही टोलेटोमणे मारले नाहीत. अहमदनगरचे पाचवेळा आमदार राहिलेले अनिल राठोड हे अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक. त्यांना श्रद्धांजली वाहतानाही मुख्यमंत्र्यांना राजकारण आठवले. ह्यअनेक जण इतर राज्यांमधून मुंबईत, महाराष्ट्रात येतात, इथे रोजीरोटी, नाव कमावतात.

काही जण इथलं ऋण मानतात, काही जण मानत नाहीतह्ण, असा टोला  ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना रनौतला नाव न घेता हाणला. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने सध्या मोर्चाच उघडला आहे. त्यातच केंद्रीय गृह मंत्रालयाने तिला सोमवारी वाय सुरक्षा बहाल केली. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर मला हात लावून दाखवाच असे आव्हान तिने दिले आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी त्यावर जळजळीत प्रतिक्रिया दिलेली होती. मुंबई पोलीस, मुंबईबद्दल अनुद्गार काढणाऱ्या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही असे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. कंगनावरून आता नवेच राजकारण सुरू झाले आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनाचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे.

महाराष्ट्राची आणि प्रामुख्याने मुंबईची बदनामी करणाऱ्या कंगना राणावतवर राज्याच्या गृह विभागाने कायदेशीर कारवाई करावी असा एकमुखी ठराव विधानसभेत मंजूर करावा, असे पत्र शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. उद्या खरेच हा ठराव येईल का, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे हा ठराव दाखल करून घेतील का ते पहायचे. शिवसेनेचे आमदार या मुद्यावरून गोंधळ घालतील असे दिसते.

कंगनाने मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केला तरी तिला केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा पुरवणे ही धक्कादायक बाब असल्याचे आणि सर्वच पक्षांनी कंगनाचा निषेध करायला हवा,अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगेच दिली. मुळात राज्यावर कोरोनाचे भीषण संकट असताना कंगनाच्या निषेधाचा ठराव आणून त्यावर चर्चा करणे उचित आहे का याचे तारतम्य सरकारने बाळगायला हवे. कंगनावर कारवाई करण्याची राज्य सरकारची मानसिकता असेलच तर मग ठरावाची काय गरज? गृह विभागाला स्वत:च्या अधिकारात तो निर्णय घेता येतो.

कंगनाबाबतचा ठराव आणला तर भाजप त्याला विरोध करेल आणि मग भाजप कसा मुंबईद्रोही आणि महाराष्ट्रद्वेष्टा आहे हे ओरडून सांगता येईल एवढाच जर संकुचित उद्देश ठरावामागे असेल तर त्याच्याइतके दुर्देव दुसरे नाही.

कोरोनाचे महाभीषण संकट महाराष्ट्रासमोर आ वासून उभे आहे, आरोग्य कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीत म्हणून ते आंदोलनावर उतरले आहेत. आरोग्य असुविधांच्या बिकट परिस्थितीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. कोरोनाच्या दहशतीखाली वावरणारे राज्य मोकळा श्वास मागत आहे. भयभीत आम नागरिक या अधिवेशनात कोरोनामुक्तीसाठी शासन काय ठोस करते याची वाट पाहत आहे. कंगनावर ठराव आणण्यापेक्षा त्या भावनांना हात घालणारे कामकाज मंगळवारी विधिमंडळात झाले तर बरे होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER