जळगांव महापालिकेत शिवसेनेकडून राजकीय भूकंप, भाजपचे तब्बल २७ नगरसेवक सेनेकडे ?

Maharashtra Today

जळगाव : महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीला अवघे ४ उरले असतानाच शिवसेनेकडून राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी भाजपचे ५७ पैकी २७ हून अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपमधील काही सूत्रांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपकडून व्हीप जारी करण्यापूर्वीच हे नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. दरम्यान, महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला आहे. तसंच महापौरपदासाठी जयश्री महाजन यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

जळगाव महापालिकेत भाजपचं स्पष्ट बहूमत आहे. महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. तर १८ मार्च रोजी नवीन महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक संपन्न होणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपमध्येच चांगलीच चुरस वाढली होती. रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच भाजपचे नगरसेवक सहलीवर रवाना झाल्यामुळे महापालिकेत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत शिवसेनेकडून महापालिकेवर भगवा फडकवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी केवळ ४ दिवस उरले असतानाच शिवसेनेनं सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. रविवारी दुपारी २ वाजेपासून भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाऊसवर एकत्र जमल्याची माहिती सुत्रांनी दिली. या ठिकाणाहूनच सेनेची सर्व सूत्रं हलली असल्याचंही सांगण्यात येत आहे. तसंच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही चर्चा आहे.

या निवडणुकीत शिवसेनेने चतुर खेळी करून भाजपमधील एका मोठ्या गटाला गळास लावले आहे. तर, एमआयएम देखील आमच्या सोबत असल्याचा दावा आज माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी केला आहे. यामुळे आता महापालिकेत शिवसेना, भाजपचा फुटीर गट आणि एमआयएम अशी नवीन आघाडी आकारास येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.आता १८ मार्च रोजी भाजप विरूध्द शिवसेना, भाजपचा फुटीर गट आणि एमआयएम या दोन आघाड्यांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेने सावधगिरी म्हणून आपल्या सदस्यांसह फुटी गटाला सहलीवर पाठविले आहे. तर, भाजपचे नेते देखील कसलेले असल्यामुळे ते सहजासहजी सत्ता सोडणार नसल्याची बाबही दुर्लक्ष करण्याजोगी नाही. यामुळे आता १८ मार्च रोजी नवीन आघाडी बाजी मारणार की भाजप सत्ता कायम राखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, महापालिकेत भाजपचं बहुमत असलं तरी पक्षांतर्गत वाद विकोपाला गेला आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं ते भाजपविरोधात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. पण महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना नगरसेवकांनी मध्यंतरी खडसे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपचे नगरसेवक नॉट रिचेबल होण्यामागे खडसे यांचाही हात असल्याची चर्चा सध्या जळगावात सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER