राजकीय मार्ग बदलला, तरी मोदी आणि ठाकरे यांच्यात भावनिक नातं – संजय राऊत

Sanjay Raut-CM Thackeray-PM Modi

नवी दिल्ली :- मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार आहे. त्यांच्या या भेटीसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. ‘उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये जी चर्चा होते, ती राज्याच्या विकासाबाबत होते, योजना, रखडलेल्या कामांविषयी होते. तशी चर्चा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये होणार आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न, विकासकामं, पायाभूत सुविधा असे अनेक विषय आहेत. राजकीय मार्ग जरी बदलले असले, तरी नातेसंबंध महाराष्ट्र टिकवत आला आहे’, वैचारिक आणि तात्विक मतभेद असू शकतात. मात्र नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचं एक भावनिक नातं आहे. राजकारणाच्या पलिकडे अशी नाती असू शकतात. ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही. असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी-उद्धव भेटीवर भाष्य केलं

‘सोनिया गांधींशी उद्धव ठाकरेंचे संबंध चांगलेच आहेत. याआधी आदित्य ठाकरेही भेटून गेले आहेत. त्यामुळे संबंध सुधारण्याचा प्रश्नच नाही. लालकृष्ण अडवाणी हे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक राहिले आहेत. शिवसेनेबाबत त्यांची भूमिका कायमच प्रेमाची आणि आस्थेची राहिली आहे. उद्धव ठाकरेंना त्यांनी कायमच आशीर्वाद दिला आहे.’ असंही राऊत म्हणाले.

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सोनिया, ममता, पवारांनाही बोलवायला हवे : शिवसेना

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या प्रश्नावर उत्तर देतांना ते म्हणाले की, एकट्या भाजप सरकारमध्येही मतभेद होते, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद असणं साहजिक आहे. महाराष्ट्रातील सरकारमध्ये कोणाचेही कोणाशीही मतभेद नाहीत. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे सरकारचं नेतृत्व करत आहेत. एनपीआरबाबत तीन पक्षांमध्ये वेगळी भूमिका असली, तरी मतभेदाचा सरकारला त्रास नाही. हे तीन पक्षाचं सरकार आहे. तीन पक्ष अतिशय उत्तम काम करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या तिघांचाही एकमेकांशी चांगला संवाद आहे. कुठल्याही विषयावर मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही. असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

अयोध्येत जर राम मंदिर बांधलं जात आहे, तर राम जन्मभूमीसाठी झालेल्या संघर्ष आणि आंदोलनात जे शहीद झाले, त्यांचं स्मारक व्हावं अशी सूचना आम्ही केली. गोळीबारानंतर लाल झालेली शरयू नदी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिली आहे. बरेचसे शहीद अज्ञात आहेत, मात्र ज्यांची नावं उपलब्ध आहेत, ती कोरली जावीत. न्यायालयाच्या आदेशाने केंद्र सरकारने ट्रस्ट स्थापन केला आहे, निर्णय ते घेतील.’

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ कोटी मुस्लिम १०० कोटी जनतेला भारी पडतील, असं विवादित भाष्य केल्यानंतर संजय राऊतांनी त्यांचाही समाचार घेतला. ‘कोण वारिस पठाण? त्यांना विनाकारण महत्त्व दिलं जात आहे. १५ कोटी सोडा, त्यांच्यामागे १५ लोकं येऊ द्या, त्यांचा मी सत्कार करेन’ असे म्हणत त्यांनी पठाण यांचा समाचार घेतला.