अजित पवारांना डावललं जातंय?

ajit pawar

Badgeबाळासाहेब ठाकरे यांना अटक करायला हवी होती का? ह्या वरून धुमशान सुरु आहे. १९ वर्षांपूर्वी झालेल्या बाळासाहेबांच्या अटकेची आज चर्चा करून काही उपयोग नाही. तो विषय केव्हाच संपला.

पण त्यावरून अजितदादा पवार आणि छगन भुजबळ यांच्यात झालेले राजकीय महाभारत पाहता राष्ट्र्वादीतली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अजितदादांच्या सुप्त महत्वाकांक्षाही बाहेर आल्या आहेत. पण आता त्यांचे म्हणणे खोदून काढण्याचे धाडस लोक करू लागले आहेत. शरद पवारांचा वारस कोण? हे बाहेर लोकांना कळलेले दिसते.

ही बातमी पण वाचा:- त्या दिवशी राजीनामा देण्याची काही गरज नव्हती’; भुजबळांची अजित पवारांवर बोचरी टीका

अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि आहे. आघाडीची सत्ता होती तेव्हा हे सहज जमलं असतं. पण तब्बल १५ वर्षात शरद पवारांनी तसे का घडू दिले नाही हे कोडे आहे. एकदा तर संधी असतानाही पवारांनी काँग्रेसला संधी दिली. अजितदादांना हे खटकत नसेल अशातला भाग नाही. अलीकडे संधी मिळताच दादा वेगळ्या भाषेत बोलून जातात. बाळासाहेबांना अटक करण्याची गरज नव्हती असे सांगून दादांनी द्यायचा तो सिग्नल देऊन टाकला. ईडी केसवरुन शरद पवारांनी देश ढवळून काढला असतांना त्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देऊन अजितदादांनी सारा फोकस बदलून टाकला असा टोला ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी मारला. अजितदादांच्या वक्तव्य खोदून काढण्याची हिंमत पवारांच्या मूक संमतीशिवाय कुणी करू शकत नाही. पण अलीकडे ती सुरु झाली आहे. निवडणुकीची सूत्रे अजितदादांकडे जातील ह्या धास्तीने शरद पवारांनी ह्या वयात फिरणे पसंत केले का? संभाजीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेले खासदार अमोल कोल्हे यांना स्टार प्रचारक म्हणून भाव दिला जात आहे. दादांचे पंख कापण्यासाठीच ही घेराबंदी असल्याची चर्चा राष्ट्रवादीत रंगते आहे.

पवारांच्या कुटुंबात सारेच आलबेल नाही ही चर्चा जुनी आहे. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी पवारांनी आपल्यातला ‘चाणक्य’ पणाला लावला. पण मोदीलाटेत त्यांचे काही चालले नाही. ह्या चर्चेला लोकसभा निवडणुकीपूर्वी तोंड फुटले. पार्थ आक्रमक झाला तेव्हा कुठे त्याला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. आणि आता दुसऱ्या नातवाची जोरात चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीची धुरा पुतण्याला देण्याऐवजी काकाने स्वतःकडे घेतली. पुतण्या फिरला असता तरी काही विशेष फरक पडला असता अशातला भाग नाही. काकामुळेही काही जागा वाढतील असे नाही.

तरीही आपल्याला कुठेतरी डावलले जातंय हे अजितदादांनाही जाणवत असेल. आता तर पक्षातलेच नेते त्यांना डोळा दाखवू लागले आहेत. पण ते बोलून दाखवण्याची हिंमत त्यांना होत नाही. म्हणून मग ते मीडियापुढे रडून आपले काकाप्रेम प्रेम व्यक्त करतात. पण थोरल्या साहेबाने बांधलेल्या शिस्तीच्या भिंती कधीतरी गळून पडतील. तो दिवस दूर नाही असे राजकीय विश्लेषकांना वाटते.