कोरोनाच्या लढ्यासाठी राजकीय नेत्यांची आर्थिक मदत; या नेत्यांनी केली घोषणा

Political Leaders Corona Relief Fund

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भारतावर मोठं संकट उभं राहिलं आहे. देशात कोरोनाचे ७०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचं घोषित केलं. १४ एप्रिलपर्यंत लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, हे २१ दिवस देशासाठी महत्त्वाचे आहेत अशी कळकळीची विनंती पंतप्रधानांनी जनतेला केली आहे.

राज्यभरात १९ रुग्णांना डिस्चार्ज; कोरोना बरा होतोय हे आशादायी- राजेश टोपे

कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केले. नितीन गडकरी यांनी एक महिन्याचं वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीत देणार आहेत. गडकरी यांनी देशातील लोकांना संकटाच्या काळात पुढे येऊन योगदान द्यावं असं आवाहनही केलं आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही एक कोटींची मदत केली आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी जनतेला सुविधा देण्यासाठी खासदार निधीतून १ कोटींची मदत देत आहे. या निधीचा उपयोग जिल्हा प्रशासनाकडून योग्य प्रकारे केला जावा असं त्यांनी सांगितलं आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघात खासदार निधीतून २ कोटी ६६ लाखांचा निधी घोषित केला आहे. वायनाडमध्ये आवश्यक आरोग्यविषयक उपकरणांची खरेदी करण्यासाठी या निधीचा वापर व्हावा असं त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षातील आमदार आणि खासदारांना एक महिन्याचा पगार सहायता निधीत जमा करण्याचा आदेश दिला आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेनही आपल्या आमदार खासदारांना अश्या सूचना केल्या आहेत.