राष्ट्रपती राजवटीचा वाढला धोका

badgeतेराव्या विधानसभेची मुदत उद्या मध्यरात्री संपत आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात एकमत होत नसल्याने राज्यात कधी झाला नसेल असा सत्तापेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार कोकणचा दौरा रद्द करून मुंबईकडे निघाले आहेत. येत्या १२ तासांत मुंबईत खूप वेगवान घडामोडी घडलेल्या असतील.

युती करून भाजप-शिवसेना निवडणूक लढले. ह्या युतीला बहुमतही मिळाले. पण सत्तेच्या दुकानाच्या वाटपात दोघांमध्ये भांडणे सुरु आहेत. कटुता एवढी वाढली आहे, की शिवसेनेने आपले ६४ आमदार मुंबईच्या ‘रंगशारदा’ हॉटेलात बंद करून ठेवले आहेत. मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडायला शिवसेना तयार नाही. भाजप द्यायला तयार नाही. भाजपचे नेते आज दुपारी राज्यपालांना भेटले. पण त्यांनी सत्तेचाही दावा केला नाही. ‘सरकार बनवायचे नाही असे भाजपने जाहीर करावे. मग आम्ही पुढे येऊ’ असे सेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पण कुणीही पुढे येत नसल्याने राष्ट्रपती राजवटीचा धोका वाढला आहे. लवकरच पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील अशी परिस्थिती तयार होत आहे.

सत्तेत निम्मा-निम्मा वाटा करायचा असे लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा यांच्यासोबत ठरले होते असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. त्या कराराप्रमाणे अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद उद्धव मागत आहेत. पण तसे काहीही ठरले नव्हते असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे. ह्या दोघा नेत्यांमध्ये चर्चाच होत नसल्याने युतीचे दोर केव्हा कापले गेले आहेत.

ही बातमी पण वाचा : भाजप नेत्यांची राज्यपालांशी चर्चा, मात्र सत्ता स्थापनेचा दावा नाही!

बहुमतासाठी १४५ आमदार पाहिजेत. तेवढे आमदार नसल्याने आणि पुढेही मिळण्याची शक्यता कमी असल्याने भाजप सत्तेचा दावा करायला पुढे आलेला नाही. दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन बहुमताची मोट बांधण्याचा उद्धव यांचा डाव आहे. पण सोनिया गांधी शिवसेनेसोबत आपल्या आमदारांना बसवायला तयार नाहीत. २०१४ मध्ये म्हणजे मागच्या निवडणुकीतही भाजपकडे बहुमत नव्हते. दीड महिन्याने त्याने शिवसेनेला सोबत घेतले होते. आताही सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपला बोलावतील. पण काही दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करता आले नाही तर सरकार पडेल. असे झाले तर राज्यपाल शिवसेनेला बोलावतील. सेनेलाही जमले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करण्यावाचून राज्यपालांना दुसरा पर्याय उरणार नाही. भाजप अशीच स्थिती निर्माण करत आहे का?

उद्धव ठाकरे एवढे ताणून धरणार नाहीत असे भाजप नेत्यांना वाटत होते. पण उद्धव यांनी सत्तासंघर्ष एवढा टिपेला नेला आहे की, नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत कुणीही फार काही करू शकत नाहीत. महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाला देण्याला अमित शहा तयार नाहीत. त्यामुळे हा पेच कसा सुटेल हे कोणीही सांगू शकत नाही.

सोनिया गांधी यांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश आले तर चमत्कार होऊ शकतो. कोकणचा दौरा रद्द करून पवार त्यासाठीच मुंबईला निघाले आहेत. भाजपला एकटे पडण्याचा फॉर्म्युला म्हणून सोनिया तयार झाल्या तर राज्यातील सत्तेची समीकरणे बदलू शकतात. आज रात्री काय शिजते त्याकडे देशाचे लक्ष राहणार आहे.