महाजनांच्या मदतीला एकनाथ खडसे धावून आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य

Girish Mahajan-Eknath

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात तसेही राजकीय सख्य नसताना एकनाथ खडसे गिरीश महाजनांच्या सेल्फी प्रकरणात महाजनांच्या मदतीला धावून आले आहे. महाजनांवर या प्रकरणामुळे राज्यभरातून टीका झाली होती. खडसे यानी केलेल्या वक्तव्याबाबक आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एकनाथ खडसे हे कायम महाजनांना टोले लगावत असतात. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी महाजनांचा केलेला बचाव विशेष समजला जातो.आपल्यावर (खडसे) झालेल्या आरोपांचा हवाला देत गिरीश महाजनांचा खडसेंनी बचाव केला. खडसे म्हणाले, कोल्हापूर, सांगली साताराच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाजन यांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी मदत पोहचली. एवढच काय तर स्वत:ही पाण्यात उतरून त्यांनी पूरग्रस्तांना वाचविण्यात पुढाकार घेतला. मात्र महाजनांनी केलेल्या मदतीपेक्षा मध्यमांनी त्यांच्या सेल्फीलाच प्राधान्य देत त्यांच्यावर टीका केली.

खडसे म्हणाले, माध्यमांच्या टीकेचा मलाही फटका बसला आहे. मी केलेल्या चांगल्या कामांपेक्षा दाऊदच्या बायकोशी आपले संबंध असल्याचे पसरविल्या गेले. माध्यमांनी कोणत्याही वृत्ताची खात्री करूनच ते प्रसिद्ध करावे आणि आपली विश्वासर्हता वाढवायला हवी, असे खडसे म्हणाले. टीआरपीच्या नादात माध्यमांनी आपण केलेल्या विधानांचा विपर्यास करून दाखवल्याचा आरोप खडसेंनी केला. पाचोरा तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.