
पोलीस खातं वास्तविक अनेक सरकारी खात्यांपैकी एक. जाता जाता कोणत्याही गोष्टीवर टिप्पणी करणाऱ्यांना सरकारी व्यवस्था म्हणजे हक्काची टीका करायची गोष्ट असं वाटतं. अनेकांना असंही वाटतं की, खासगी क्षेत्रात भ्रष्टाचार नसतोच. काहींना वाटतं की सरकारी खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार पोलीस खात्यात आहे. एक ना दोन, अनेक गैरसमज बाळगत लोक मतं व्यक्त करत राहतात.
कोरोनामुळे (Corona) संपूर्ण २०२० या वर्षावर एक नकारात्मक मुद्रा उमटली आहे. कोरोनामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेले परिणाम लक्षात घेता कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर असं या कालखंडाचं वर्णन नजीकच्या काही वर्षांत केलं जाईल, यात शंका नाही. कोरोनापूर्व सत्तेवर आलेल्या तीन पक्षांच्या महाआघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi) कोरोना काळातच एक वर्ष पूर्ण केलंय. या सरकारला संपूर्ण वर्षभरात तशा अर्थाने चार महिन्यांचा कालावधीच कारभाराला मिळाला आणि आठ महिने कोरोनाशी झुंजण्यात गेलेत.
हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे पोलीस भर्तीबद्दल आलेली एक बातमी. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पुणे भेटीवर आले असताना राज्यात कोरोनामुळं लांबणीवर पडलेली पोलीस भर्तीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असं सांगितलंय. त्यामुळे राज्यभरात साडेबारा हजार पोलिसांची भर्ती होऊ शकणार आहे.
दरदिवशी किमान दहा ते बारा तास काम करणाऱ्या सर्वच पोलिसांना या भर्तीमुळे दिलासा मिळणार आहे; कारण त्या सर्वांचे कामाचे तास दहा ते बारा तासांवरून आठ तासांवर येऊ शकणार आहेत. त्याशिवाय पोलिसांना साप्ताहिक सुटीही मिळू शकणार आहे, ही तर फारच आनंदाची बाब आहे.
आमच्या लहानपणी म्हणजे साधारण चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी हिंदी सिनेमात हिरो आणि व्हिलनची गँग यांची मारामारी संपत आली की पोलिसांची एन्ट्री व्हायची. म्हणजे हिरो जिंकणार असं दिसू लागलं की पोलिसांच्या गाड्यांचा सायरन वाजायचा आणि पोलीस घटनास्थळी दाखल व्हायचे. पोलीस आले की पाठोपाठ द एंडची पाटीही झळकायची. त्यातून पोलिसांचा काही उपयोग नाही, अशी प्रतिमा तयार झालीय. त्याबरोबरच सिनेमातून पोलिसांचे चित्रण हे अर्धसत्यासारखे काही सन्मान्य अपवाद वगळता भ्रष्टाचारी असेच जास्ती प्रमाणात झालेय.
त्यामुळे खाकी वर्दीतला पोलीस हाही आपल्यासारखा माणूस आहे, हे बऱ्याचदा विसरले जाते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना जास्ती काम तर करावे लागते; पण वर्षभरात कोणत्याही सणाला पोलीस आपल्या घरात नसतात तर बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात असतात. गणपती असो की ईद किंवा ख्रिसमस असो की गुरू नानक जयंती किंवा महावीर जयंती, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, सामाजिक सलोखा बिघडू नये, हे पोलिसांनाच बघावं लागतं. त्याहीपेक्षा कोरोना काळात तर अगदी घरातून बाहेर पडताना लोकांनी मास्क घातलाय की नाही, हेही पोलिसांना बघावं लागलंय.
एकूण सरकारी खात्यांपैकी लोकांशी थेट संबंध असणारं पोलीस खातं असल्यानं त्याविषयीच्या अनुभवांची चर्चा जास्ती होते. भ्रष्टाचार जरूर आहे पण तरीही वर्दीतल्या पोलिसामागे एक माणूस आहे, हे विसरता कामा नये. नव्या भर्तीमुळे किमान कामाचा ताण कमी होणार असेल आणि आठवड्यातून एक दिवस पोलीस बांधव आपापल्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार असतील, तर ती आनंदाचीच बाब आहे.
चला उद्या सुटी, वीकली ऑफ…मला फोन करू नका, असं आता पोलिसांनाही म्हणता येईल, अशी आशा करू या. एरवी वर्दीतच दिसणारे पोलीसमामा फॅमिलीबरोबर हॉटेलमध्ये, सिनेमागृहात साध्या वेषात दिसलेत आणि चेष्टाविनोदात दंग आहेत, मुलांबरोबर भेळ, आइस्क्रीम खाताहेत, शॉपिंग करताहेत हे चित्र डोळ्यासमोर आणा. कल्पनेनंच वेगळं वाटतंय. पण ते प्रत्यक्षात यायला हवं. पोलीस बांधवच नाही तर सामान्य माणसांचं जगणं सामान्यच राहावं, यात योगदान देणाऱ्या सर्वांनाच साप्ताहिक सुटी मिळावी, हा विचार आपण सारे करू या.
शैलेंद्र परांजपे
Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला