पोलीस बदली रॅकेट : भाजपकडून आणखी एका संशयित व्यक्तीच नाव उघड

Ashish Shelar

मुंबई : राज्यातील पोलीस बदली रॅकेट संदर्भातील पुरावे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवां सुपूर्द केले आहे. त्यानंतर आता भाजपानं या प्रकरणात एक नवं नाव उघड केलं आहे. पोलिसांच्या बदली रॅकेटमध्ये बंदा नवाज नावाचा हस्तक असून त्याच्यावर याआधीच ट्रायल सुरू आहे. या बंदा नवाजचे काँग्रेसशी संबंध असून तो पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याला मोकळेपणान फिरता यावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, असा खळबळजनक आरोप भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी आशिष शेलार म्हणाले की, पोलीस बदली रॅकेट संदर्भात मी आज एक गंभीर आरोप करतोय. २०१७ साली देखील असंच एक रॅकेट काम करत होतं पण त्याचा वेळीच बिमोड केला गेला. त्यात बंदा नवाज नावाच्या हस्तकामार्फत पोलीस बदलीच्या ऐवजी पैशाचे व्यवहार होत होते. त्यावेळी योग्य ती कारवाई करुन त्याच्यावर ट्रायल देखील सुरू आहे. हाच बंदा नवाज आता पुन्हा सक्रिय होऊन काम करतोय. बंदा नवाज हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि त्याला आता वाचविण्यासाठी सरकारचा आटापिटा चालला आहे.

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात एटीएसला राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी काम करू दिलं नसल्याचाही आरोप शेलार यांनी यावेळी केला. मनसुख हिरण प्रकरणात एटीएसला काही ठिकाणी छापे टाकायचे होते. त्यासाठी सहा टीम देखील तयार करण्यात आल्या होत्या. पण ऐनवेळी सरकारकडून छापे थांबविण्याचे आदेश देण्यात आले. राज्य सरकारच्या दबावातून या प्रकरणातील अनेक पुराव्यांशीही छेडछाड करण्यात आली, असा आरोप शेलार यांनी केला आहे.

मनसुख यांचा मृतदेह सापडला त्यावेळी त्यांच्या तोंडात रुमाल असल्याचं सांगितलं गेलं. पण शवविच्छेदन अहवालात त्यासंदर्भातील कोणताच उल्लेख केलेला नाही. दोन तास शवविच्छेदन चाललं. पण त्याच्या फक्त एक-एक मिनिटाच्या व्हिडिओ क्लिप देण्यात आल्यात. त्यामुळे मनसुख यांनी आत्महत्या केल्याचं दाखविण्यासाठी सरकारी स्तरावरुन दबाव निर्माण करण्यात आला, असंही शेलार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER