बेळगाव सीमावाद : बेळगावला निघालेल्या मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांना पोलिसांनी रोखले

police-stop-the-convoy-of-rajendra-patil

कोल्हापूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar) यांना कर्नाटकच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी त्यांचा ताफा रोखल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी राजेंद्र पाटील- यड्रावकर आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर यड्रावकर यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. त्यामुळे आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

आज देशाचे गृहमंत्री अमित शाह बेळगावात येत आहेत. अशावेळी राज्यघटनेनुसार देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा सामान्य नागरिकांचा हक्क नाकारला जात आहे. आम्ही कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करतो, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त असलेला प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, अशा शब्दांत सुनावले आहे. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..! कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन!’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER