आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या नेत्यांना नोटीसा, मुंबईच्या वेशीवर कसून तपासणी

Maratha reservation

मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झालं आहे, या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Krtanti Morcha) आंदोलनाची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मुंबई आणि लगतच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. तर राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून हा मुद्दा लावून धरला जात आहे. राज्य सरकारची ही कृती म्हणजे आणीबाणी असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे.

मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाकडून शेकडो मराठा कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांनीही अशाप्रकारच्या नोटीस बजावल्या आहेत.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाला समर्थन देण्यासाठी मुंबईत जाऊ नये. कुठेही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही, रस्ता रोको, निदर्शन करू नये, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. आंदोलन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी संबंधित मराठा कार्यकर्त्यांना दिला आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महामार्ग वाहतूक पोलीस, जिल्हा मुख्यालय अतिरिक्त पोलीस दल , खोपोली व खलापूर पोलीस, जिल्हा वाहतूक पोलीस खालापूर टोल नाक्यावर उपस्थित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER