डॉक्टरांनी मृत घोषित करण्याआधीच पोलिसांनी केली ‘आत्महत्ये’ची नोंद

अर्णव गोस्वामी प्रकरणात मूळ फिर्यादीचा गंभीर आरोप

Anvay Naik - Arnab Goswami

मुंबई : ‘रिपब्लिक टीव्ही’ (Republic TV) या वृत्तवाहिनीच्या मुंबईतील कार्यालयाचे नूतनीकरण आणि अंतर्गत सजावटीचे काम केलेले कंत्राटदार अन्वय नाईक (Anvay Naik) व त्यांची आई कुमुदिनी यांना डॉक्टरांनी अधिकृतपणे ‘मृत’ घोषित करण्याआधीच या दोघांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढून रायगड पोलिसांनी तशी नोंदही केली होती, असा गंभीर आरोप अन्वय यांची कन्या आज्ञा हिने केला आहे.

याच अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ‘रिपब्लिक टीव्ही’चे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक झाली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी आधी नोंदविलेल्या गुन्हयाचा तपास, वर्षभर तपास करूनही सबळ पुरावा न मिळाल्याने,बंद करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईविरुद्ध आज्ञा हिने उच्च न्यायालयात याचिका केली असून न्यायालयाने त्यात शनिवारी प्रतिवादींना नोटीस जारी केली. ‘ए समरी’ दाखल करून आधीचा तपास का व कसा बंद केला गेला याची चौकशी करावी व त्यात ज्यांनी बेकायदा काम केले असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आज्ञा हिची  मागणी

अन्वय व कुमुदिनी यांनी ५ मे २०१८ रोजी ‘कथित’ आत्महत्या केल्यापासूनचा सविस्तर घटनाक्रम आज्ञा हिेने याचिकेत दिला असून पोलिसांवर  गंभीर आरोप केले आहेत. तो घटनाक्रम व आरोप खरे असतील तर या प्रकरणात अनेक शंकास्थळे दिसतात.

याचिकेत आज्ञा हिने केलेल्या प्रतिपादनातील ठळक मुद्दे असे:

१. अन्वय व त्याची आई कुमुदिनी ४ मे २०१८ रोजी दादर येथील त्यांच्या घरून अलिबाग तालुक्यातील कावीर येथील त्यांच्या फार्महाऊसवर जाण्यासाठी रवाना झाले

२. ते दोघे फार्महाऊसवर बेशुद्धावस्थेत आढळल्याचा फोन दादरच्या घरी ५ मे २०१८ रोजी स. ९.१५ च्या सुमारास आला. अन्वयची पत्नी अक्षता व मुलगी आज्ञा तातडीने अलिबागला निघाल्या व दु. २.३०च्या सुमारास तेथे पोहोचल्या

३. फार्म हाऊसवर पोहोचताच अन्वय व कुमुदिनी यांनी आत्महत्या केल्याचे त्यांना सांगण्यात आले.

४. अलिबाग पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार निरीक्षक सुरेश वराडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा फार्म हाऊसवर आधीच हजर झाला होता. अन्वय व कुमुदिनी बेशुद्धावस्थेत प्रथम आढळल्यानंतर सुमारे सात तासांनी दोघांनाही अलिबागच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे  डॉक्टरांनी अन्वयला दु. ३.१० वाजता तर कुमुदिनी यांना ३.१५ वाजता ‘मृत’ घोषित केले.

५. सुरुवातीस बराच वेळ नकार दिल्यानंतर वराडे यांनी शेवटी अक्षता यांचे फिर्यादी म्हणून नाव घालून ‘एफआयआर’ नोंदवला.

६. अक्षता यांनी दिलेल्या जबानीवरून वराडे यांनी अर्णव गोस्वामी यांना चौकशीसाठी ३० मे २०१८ रोजी अलिबागला येण्यासाठी नोटीस पाठवली. परंतु त्यावेळचे रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी गोस्वामी यांना अलिबागला न बोलवता मुंबईला जाऊन त्यांची जबानी नोंदविण्यास निरीक्षक सुरेश वराडे यांना मुंबईला जाण्यास सांगितले.

७. लगेच महिनाभरात सुरेश वराडे यांची वाहतूक शाखेत बदली झाली. तरी त्यांनी अन्वय व कुमुदिनी यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास वाहतूक शाखेतूच पूर्ण करून १६ एप्रिल, २०१९ रोजी ‘ए समरी’अहवास मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात सादर केला.  तो २१एप्रिल रोजी न्यायालयाने मंजूर केला. मुख्य म्हणजे असा ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयात सादर करताना फिर्यादी या नात्याने अक्षता यांना कोणतीही सूचना पोलिसांकडून किंवा न्यायालयाकडून दिली गेली नाही.

८. प्रकरणाचे पुढे काय झाले याचा पाठपुरावा करण्यासाठी अक्षता व आज्ञा यंदाच्या माच महिन्यापर्यंत वराडे व पारसकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होत्या. पण त्यांना काही माहिती देण्यात आली नाही.

९. दोन वर्षे झाले तरी पोलीस काही करत नाहीत, अशी तक्रारवजा पोस्ट आज्ञा हिने समाजमाध्यमांत टाकली. त्यावर क़ोणीतरी हे प्रकरण केव्हाच बंद करण्यात आल्याचे उत्तर टाकले. त्यानंतर दोघींना झाल्या प्रकाराचा उलगडा झाला. त्यांनी पाठपुरावा करून सर्व माहिती व कागदपत्रे गोळा केली आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार केली.

१०. हा नंतरचा पाठपुरावा करत असतानाच यंदाच्या ६ मे रोजी अक्षता यांना त्यांच्या मोबाईलवर दोन निनावी फोन आले. ‘तुम्ही मायलेकी जे काही उद्योग करताय ते थांबवा. नाहीतर दोघींचे फोटो अन्वयच्या फोटोशेजारी भिंतीवर लटकवावे लागतील’ अशी भाषेत त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याची फिर्याद दादर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पण त्याची फारशा गांभीर्याने दखल घेतली गेली नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER