काही आयपीएस अधिकाऱ्यांनी ‘ठाकरे’ सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; गृहमंत्री देशमुखांचा दावा

Uddhav Thackeray-Anil Deshmukh

मुंबई : काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून (IPS Officers) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच सरकार पाडण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आम्ही त्यांचा तो प्रयत्न तो वेळीच हाणून पाडला, असा खळबळजनक दावा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकमत ऑनलाईनच्या ‘ग्राउंड झीरो’ (Ground Zero) कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले. सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. ते नेमके काय प्रकरण आहे? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्यासमोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल केला असता गृहमंत्री म्हणाले, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत.

पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात; पण याच्या बाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. पण हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि नाराजी लपून राहिली नव्हती. कडक लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अमिताभ गुप्ता या पोलीस अधिकाऱ्याने  येस बँक घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २२ जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी संमतिपत्र दिले. त्यामुळे सरकार अडचणीत आले. त्यांना आता पुण्याचे आयुक्त केले आहे. याचे समर्थन कसे कराल, असे विचारले असता गृहमंत्री म्हणाले, गुप्ता यांच्या हातून त्या काळात १०० टक्के चूक झाली. ती मोठी चूक होती. त्यांनी चौकशी समितीसमोर जाहीर कबुलीदेखील दिली; पण त्यांची आजपर्यंतची कारकीर्द चांगली राहिली आहे. म्हणूनच त्यांना आता पुण्याची जबाबदारी देण्यात दिली.

छोट्या छोट्या कारणांसाठी राज्यपालांकडे जाण्याचे काम विरोधी पक्षाकडून होत आहे. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत; पण त्यांनी आता राजभवनावर एक रूम घेऊन राहावे. म्हणजे जाण्या-येण्याचा त्रास होणार नाही, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले. कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी यांच्याविषयी ते म्हणाले, मुंबईला पाकिस्तान म्हणायचे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणून संबोधायचे, अशा गोष्टी करणाऱ्यांचे मी नावही घेऊ इच्छित नाही. या सगळ्या गोष्टींना भाजप खतपाणी घालत आहे- असा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER