दत्ता सामंत, गुलशनकुमार यांच्या हत्येची पूर्वकल्पना होती : राकेश मारिया

Police knew of plan to kill Datta Samant and Gulshan Kumar, says ex-top cop’s book

मुंबई : गिरणी कामगारांच्या संपामुळे जगापुढे आलेले सुप्रसिद्ध कामगार नेते दत्ता सामंत यांची हत्या होणार असल्याची माहिती आपल्याला पूर्वीच होती, असा खळबळजनक दावा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी केला आहे. सध्या मारिया यांचे ‘लेट मी से इट नाऊ’ हे आत्मचरित्रपर पुस्तक आणि त्यातील दावे गाजत आहेत.

या पुस्तकात त्यांनी ‘बंदसम्राट’ म्हणून ओळखले जाणारे कामगार नेते दत्ता सामंत, तसेच प्रसिद्ध ‘कॅसेटकिंग’ गुलशनकुमार यांच्या हत्येची आपल्याला पूर्वकल्पना होती, असे म्हटले आहे. दत्ता सामंत यांची १६ जानेवारी १९९७ रोजी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गोष्टीची आपण मुंबई गुन्हा शाखेला वर्षभरापूर्वी म्हणजे १९९६मध्ये कल्पना दिली होती, असा दावा केला आहे. गुलशनकुमार यांच्याबाबतही त्यांनी धक्कादायक माहिती दिली असून, दिग्दर्शक महेश भट यांना सूचित केल्याचे पुस्तकात मारिया यांनी लिहिले आहे.

गुलशनकुमार यांची हत्या होणार असल्याबाबत आपल्याला खबर्‍याने २२ एप्रिल १९९७ रोजी कळविले. तेव्हा मी पोलिस महासंचालनालयात कर्तव्यावर होतो. मला ही माहिती मिळताच मी गुन्हा शाखेला कळविले होते. अबू सालेम ही हत्या करणार असल्याचे खबर्‍याने सांगितले होते, असे मारिया यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. मुंबईतील शिवमंदिरापुढे गुलशनकुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, हे येथे उल्लेखनीय.