तरुणावर खुनी हल्ला करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

Arrest

रत्नागिरी /प्रतिनिधी:-  रत्नागिरी शहरातील ओसवालनगर येथील तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे़.
ओसवालनगर येथे राहणारा तौसिफ मोहम्मद शरीफ गुहागरकर (३०, ओसवालनगर, रत्नागिरी) हा तरुण शुक्रवारचा नमाज पढण्यासाठी मशिदीत गेला होता़. नमाज पढुन झाल्यावर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरी येत असताना अचानक त्याच्यावर चार तरुणांनी धारदार हत्यारांनी हल्ला केला़. हल्लेखोरांनी तौसिफवर धारदार चाकूने सपासप वार करुन पलायन केले़.

चाकूच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेला तौसिफ रक्ताच्या थारोळ्यात पडून होता़. त्यानंतर काही वेळातच तेथील रहिवाशांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले़. पोलिसांना या हल्ल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले़ या प्रकरणी जखमी तौसिफची पत्नी आलिया गुहागरकर हिने शहर पोलीस स्थानकात संशयित आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानंतर रात्री उशिरा या गुन्ह्यातील संशयित आरोपी आकीफ अशफाक पटेल (३०) आणि असरार निसार शेगले (२३, दोन्ही रा़ कोतवडे मुस्लीमवाडी) यांना पोलीसांनी अटक केली़ पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांना न्यायालयासमोर आज केले़ पोलीस अधिक तपास करीत आहेत़.