ऑनलाईन गंडवणा-या भामट्यांना पोलिसांचा चकवा

अडीच लाख मिळविले ऑनलाईन

Online Scams

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात शहरातील नागरिकांना ऑनलाईन गंडविलेल्या भामट्यांना चकवा देत पोलिसांनी त्यांना गंडविलेले अडीच लाख रुपये नागरिकांना परत मिळवून दिले. ऑनलाईन फसवणूकीच्या एकुण १३ तक्रारी पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. गेल्या ५५ दिवसांपासून भारतात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक सुशिक्षीत नागरिक हा घरातच बसून आहे. याकाळात करमणूक म्हणून टिव्ही पाहणे व मोबाईल हाताळण्यावर नागरिकांचा मोठा भर आहे. त्याचा फायदा परप्रांतीय भामट्यांनी उचलला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक तरुणांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. त्यामुळे काही बेरोजगार तरुण नोकरीची संधी शोधत आहेत. तर कोठून तात्काळ कर्ज मिळेल म्हणून तरुण बँकांच्या संपर्कात आहेत. नेमके हेच ओळखून भामटे फसवणूक करत आहेत. सायबर पोलिस ठाण्याकडे आलेल्या अर्जांमध्ये जास्तीत जास्त नोकरी मिळवून देतो, लॉकडाऊन सुरू असल्याने डेबिट, एटीएम, क्रेडीट कार्ड बंद होणार आहे, तुम्हाला लॉटरी लागली आहे, तसेच फोन करुन कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रोसेसिंग फिसच्या नावाखाली पैसे उकळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पेटीएम खाते बंद होणार आहे. त्यामुळे केवायसी अपडेट करुन देतो असे म्हणत देखील गंडविले आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात गेल्या काही दिवसात आलेल्या तक्रारींचा पोलिसांना निपटारा करत भामट्यांना चकवा दिला. विविध ऑनलाईन साईटसवरुन गंडविणा-या या भामट्यांच्या बँक खात्याचा पोलिसांनी शोध घेतला. त्यानुसार, संबंधीत बँक व ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप्लिकेशनच्या नोडल अधिका-यांशी संपर्क साधून फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शहरात फसवणूक झालेल्या १३ नागरिकांचे दोन लाख ४१ हजार ९०० रुपये त्यांच्या खात्यात आता जमा झाले आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक गिता बागवडे, उपनिरीक्षक सविता तांबे, शिपाई सुशांत शेळके, सुदर्शन एखंडे, रेवननाथ गवळे, विजय घुगे, गोकुळ कुतरवाडे यांनी केली.

दररोज चार ते पाच तक्रारी
सायबर पोलिस ठाण्याकडे ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या दररोज चार ते पाच तक्रारी येत आहेत. पोलिसांकडे वेळीच तक्रारी गेल्यामुळे भामट्यांचे बँक खाते गोठविणे पोलिसांना सहज शक्य झाले. त्यामुळे गोठविलेल्या खात्यांमधील पैसे तात्काळ नागरिकांच्या खात्यात ऑनलाईन जमा झाले. ही टोळी मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, झारखंड या राज्यातील असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

कस्टमर केअरवरही भामट्यांचे क्रमांक
अचानक ऑनलाईन पैसे गायब झाल्यावर अनेक जण गुगलवरील कस्टमर केअरच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत आहेत. मात्र, त्यावर देखील भामट्यांचेच मोबाईल क्रमांक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अचानक पैसे गायब झाल्यावर कस्टमर केअरशी संपर्क साधल्यावर समोरुन भामटा बोलत आहे. यावेळी भामटा बँक खात्याची संपुर्ण माहिती घेऊन पुन्हा पैसे लांबविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी खात्री केल्याशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तिला आपल्या खात्याविषयी माहिती देऊ नये असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

क्राईम ब्रँचची धमकी देत गंडा
औरंगाबाद क्राईम ब्रँचमधून बोलत आहे. तु एका मुलीचे अश्लिल फोटो काढले आहेत. यासंदर्भात मुलीने आमच्याकडे तक्रार केली आहे. तेव्हा अटक करायची नसेल तर आमच्या खात्यावर तात्काळ पैसे पाठव अशी धमकी देत परप्रांतीय भामट्यांनी एका तरुणाला २५ हजारांना गंडविले आहे. याबाबत तरुणाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला