‘मातोश्री’वर आंदोलनासाठी निघालेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

- राज्यात राष्ट्रपती राजवट लावा; नवनीत राणा यांची मागणी; मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

Navneet Rana & Ravi Rana

अमरावती : शेतकऱ्यांना (Farmer) तातडीने नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी मुंबई येथे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर आंदोलनासाठी निघालेले आमदार रवी राणा (Bdanera MLA Ravi Rana)आणि खासदार नवनीत राणा (Amaravati MP Navneet Rana) यांना अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतले.
राष्ट्रपती राजवट लावा – नवनीत राणा

पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्त कार्यालयात नेले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू न देण ही लोकशाहीची हत्याआहे, असा आरोप राणा दाम्पत्याने केला. खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. रविवारी अमरावती जिल्हा कोर्टाने राणा यांना जामीन मजूर केला. रवी राणा यांच्यासह अटक केलेल्या शेतकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

तुरुंगातून बाहेर येताच रवी राणा यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबते आहे. हजारो शेतकऱ्यांसह सोमवारी (१६ नोव्हेंबर) रोजी ‘मातोश्री’वर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

नवनीत राणा दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळावी, लॉकडाऊन काळात आलेले वीज बिल निम्मे माफ करावे आणि तुरुंगात असलेले आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांची सुटका करावी, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरल्या.

मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

सुटका झाल्यानंतर अमरावतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात आज ( रविवारी ) मोर्चा काढण्यात आला. राजकमल चौक येथे नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. सरकार विरोधात घोषणा दिल्या. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER