पीएमसी बँक घोटाळाप्रकरण; बँकेच्या संचालक मंडळावरील तिघांना पोलीस कोठडी

PMC bank fraud

मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र (पीएमसी) बँकेत करण्यात आलेल्या तब्बल 4 हजार 355.46 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने मंगळवारी सायंकाळी अटक केलेल्या जगदीश मुखी, मुक्ती बावीसी आणि तृप्ती बने या तिघांनाही न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिघेही बँकेच्या संचालक मंडळांवरील आजी-माजी सदस्य असल्याने या तिघांकडून गुन्ह्याच्या चौकशीत महत्वपूर्ण माहिती हाती लागण्याच्या पोलिसांच्या मागणीवरुन न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

हौसींग डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर लि. (एचडीआयएल) कंपनीला विविध मार्गांनी वित्तपुरवठा करुन पीएमसी बँकेत करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेचे विशेष पथक तपास करत आहे. आर्थिक गुन्हेशाखेच्या चौकशीला सामोरे गेलेेल्या मुखी यांच्यासह बावीसी आणि बने या समर्पक उत्तरे देऊ शकल्या नाहीत. अखेर मंगळवारी सायंकाळी या तिघांनाही अटक करण्यात आली होती.

तिन्ही आरोपींना आर्थिक गुन्हेशाखेने बुधवारी किल्ला कोर्टात हजर केले. तिन्ही आरोपी हे बँकेच्या संचालक गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत. त्यामूळे या तिघांचाही गुन्ह्यातील सहभाग आणि त्यांच्या चौकशीतून घोटाळ्याबाबत महत्वपूर्ण माहिती हाती लागू शकते.

तसेच यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेली माहिती आणि गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे चौकशीसाठी तिन्ही आरोपींना जस्तीत जास्त कोठडी देण्याची मागणी पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत तिघांनाही 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश बजावले आहेत.

पीएमसी बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएल कंपनीचे सर्वेसर्वा राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या पितापुत्रांसह पीएमसी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी अध्यक्ष वरयम सिंग आणि बँकेचे माजी संचालक सुरजीतसिंग अरोरा, भाजपाचे माजी आमदार सरदार तारासींग यांचा मुलगा आणि बँकेच्या संचालक मंडळावरील सदस्य राजनीत सिंह उर्फ जॉनी यांच्यासह अशोक जयेश अ‍ॅन्ड असोशिएट्सचा भागिदार जयेश संघानी आणि लकडावाला अ‍ॅन्ड कंपनीचा भागिदार केतन लकडावाला यांच्यासह महिला लेखापाल अनिता किरदत्त हीला अटक केली आहे.