संदेश सारसबाग पुन्हा बंदचा…

Shailendra Paranjapeपुण्यामधे (Pune) नागरिकांच्या अतिउत्साहामुळे आणि नियम न पाळण्याच्या किंवा हुज्जत घालून सरकारी कर्मचाऱ्यांना वादविवादात निष्प्रभ करण्याच्या गुणांमुळे ऐतिहासिक सारसबाग (Sarasbaug) पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सारसबाग या उद्यानाच्या मध्यभागी तळं असून त्यात पेशव्यांच्या काळातले गणपतीचे मंदिर आहे. ग्रामदैवत कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी या दोन देवस्थानांइतकेच देवदेवेश्वर संस्थान पर्वती आणि सारसबाग या दोन देवस्थानांनाही पुण्यात महत्त्वाचं स्थान आहे.

पुण्यामधे उद्यानं, सार्वजनिक बागा खुल्या करण्यात आल्या. करोना काळात म्हणजे लॉकडाऊनच्या काळात महापालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारीही करोना ड्यूटी करत होते. त्यामुळे शहरातली सर्व उद्यानं बंद होती. त्यानंतर हळू हळू सर्व उद्यानं खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिवाळीच्या वेळी नरक चतुर्दशीला पहाटे उठून सूर्योदयाला सारसबागेतल्या गणपती मंदिरात जायचं आणि गणपतीचं दर्शन घेऊन दिवस सुरू करायचा, हा हजारो पुणेकरांचा प्रघात. त्यानुसार दर वर्षी सारसबागेत दिवाळी सुरू होताना पहाटे हजारो नागरिक सहकुटुंब नवे कपडे घालून येतात आणि मित्रमंडळी, आप्तेष्ट, जुने वर्गमित्र यांचं जणू स्नेहसंमेलनच या बागेत भरतं.

यंदा उद्यानं खुली होती पण मंदिरं मात्र बंद होती. त्यामुळे सारसबागेसमोरच्या चिमाजी अप्पा पेशवे रस्त्यावरूनच गणपतीचं दर्शन लोकांनी घेतलं. काही जण बागेत फेरफटका मारूनही आले. पण मंदिर खुलं नसल्यानं लांबूनच गणेशाचं दर्शन घ्यावं लागलं होतं.

गेल्या काही दिवसात बागेमधे होऊ लागलेली गर्दी आणि त्यातही लहान मुले तसंच ज्येष्ठ नागरिक यांचा मुक्त वावर, हा बागेच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं चिंतेचा विषय झाला. अनेक ज्येष्ठ नागरिक मास्क न लावता बागेत आल्यावर आणि त्यांना कर्मचाऱ्यांनी हटकल्यावर ते हुज्जत घालून वेगवेगळ्या प्रकारची कारणं देऊ लागले. परिणामी, उद्यानं खुली केल्याने प्रशासनाला हात दाखवून अवलक्षण, असा अनुभव आला. त्यामुळेच महापालिकेच्या उद्यान विभागानं सारसबाग नागरिकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिशन बिगिन अगेन करताना करोनाविषयक काळजी घेणं हे सर्वांसाठीच सक्तीचं आहे. त्यातून कोणाचीही सुटका नाही. राज्यातल्या महत्त्वाच्या देवस्थानांनी ज्येष्ठ नागरिकांनी दर्शनालाही येऊ नये, लहान मुलांना विशेषतः दहा वर्षांच्या आतल्या मुलांना देवळातून आण नये, हे आवाहनही केलंय. असं असताना पुण्यात मात्र रखवालदार, दारवान, शिपाई किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून आपल्या बेजबाबदार वर्तनाचं समर्थन करणारे प्रज्ञावंत करोनाची दुसरी लाट यायला कारणीभूत ठरणार आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.

वास्तविक, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी मास्क घातलाय की नाही, हे पाहण्याचं काम पोलिसांचं नाही. पण केवळ चौकात पोलीस उभा असला तरच सिग्नल पाळण्याची संस्कृती असल्यानं पुण्यात मास्क चेक करायलाही पोलिसांची गरज लागतेय. शहराचा लौकिक प्रगतीशील, प्रज्ञावंतांचं शहर असा असला, ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट असं पुण्याला म्हणत असले तरी स्वयंशिस्तीचा अभाव हे पुण्याचे फार मोठे अपयश आहे, असं करोना काळात अनेकदा समोर आलं आहे.
शहर, समाज, राज्य, देश एका रात्रीत मोठे होत नसतात. जपानमधे हिरोशिमा, नागासकीवर बॉम्ब पडल्यानंतर बेचिराख झालेला जपान पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारखा उभा राहिलाय. आपण करतोय ती प्रत्येक कृती देशाच्या भल्यासाठी किंवा बुऱ्यासाठी होणार आहे, याचा विचार प्रत्येक जपानी व्यक्ती करत असते. त्याची अनेक उदाहरणे लोक देतात. ती राष्ट्रीयत्वाची आणि आपण आपले राज्य, देश, शहर, गल्ली यांचे अँम्बँसँडर आहोत, ही भावना अंगी जागवली तर सारसबाग बंद सारखी वेळ ना पुणेकरांवर येईल ना देशावर पुन्हा लॉकडाऊनची.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER