स्थलांतरितांनी अपरिमित यातना सोसल्या ; सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींचे देशवासियांना पत्र

PM Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने मोदी यांनी देशवासियांना संबोधून पत्र लिहिले आहे. संकटाच्या या काळात कोणालाही त्रास झाला नाही असा दावा करणं चुकीचं ठरेल. श्रमिक मित्र, प्रवासी कामगार बंधू-भगिनी, छोटय़ा-छोटय़ा उद्योगात काम करणारे कारागीर, स्थानकांवर सामान विकणारे, टपरी -हातगाडी लावणारे, दुकानदार , लघू उद्योजक अशा सहकाऱ्यांनी अपरिमित यातना सोसल्या आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत,” असे नरेंद्र मोदी यांनी पत्रात म्हटले आहे.

मोदींनी आपण ज्या अडचणींना सामोरं जात आहोत त्या मोठ्या संकटात रुपांतरित होऊ नयेत याची काळजी घेणंही महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. लॉकडाउनमुळे हातातील काम गेल्याने हजारोंच्या संख्येने कामगार आपल्या राज्यात परतत आहे. सुरुवातीला कोणतंही साधन नसल्याने कामगार चालत आपल्या घऱी निघाले होते. अनेकांनी हजारो किलोमीटरचा प्रवास चालत पार करुन घर गाठलं. अजूनही अनेक मजूर, कामगार प्रवास करत असून रेल्वेकडून श्रमिक ट्रेन सोडल्या जात आहेत.

“देशवासीयांच्या इच्छा- आकांक्षांच्या पूर्ततेसाठी जलदगतीने मार्गक्रमण करत असतानाच करोनाने भारतालाही विळखा घातला. एकीकडे अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि विशाल अर्थव्यवस्था असलेल्या जगातील मोठमोठय़ा महासत्ता आहेत तर दुसरीकडे इतकी प्रचंड लोकसंख्या आणि अनेक आव्हानांनी ग्रासलेला आपला भारत देश आहे. जेव्हा करोनाचा संसर्ग वाढेल तेव्हा भारत पूर्ण जगासाठी संकट ठरू शकतो, अशी भीती काही जणांनी व्यक्त केली होती. परंतु भारताकडे बघण्याचा साऱ्या जगाचा दृष्टिकोन बदलला. टाळ्या-थाळ्या वाजवून आणि दिवे प्रज्वलित करून तसेच सेनेकडून करोना योद्धय़ांचा सन्मान असेल, एक दिवसाची जनता टाळेबंदी असेल किंवा देशव्यापी टाळेबंदी दरम्यान नियमांचे निष्ठेने पालन असेल, या सर्व प्रसंगी भारत हीच आपली खरी शक्ती आहे हे साऱ्यांनी दाखवून दिले”, असे मोदींनी पत्रात म्हटले आहे .

तसेच अनुच्छेद ३७० रद्द करणे, राम मंदिराचा निर्णय, तिहेरी तलाकच्या कुप्रथेला चाप लावणे आमि नागरिकत्त्व सुधारणा कायदा (CAA) अशा ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख मोदींनी या पत्रात केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER