‘कोरोनाविरुद्ध एकजुटीने लढाई करू या !’ पंतप्रधान मोदींनी साधला राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला . केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सोबत असून केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमत्र्यांना दिले. कोरोनाविरुद्ध एकजुटीने लढाई करू या, असे आवाहनही त्यांनी केले .

पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी अनेक उपयुक्त सूचनाही केल्या.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादात पंतप्रधानांनी लॉकडाऊनवर विशेष भर दिला आहे. यावेळी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यात यावे, असा आग्रह पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केला. मात्र, सर्व राज्यांमधील सरकारांनी आपल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा योग्य तो पुरवठा करावा, कुणाला त्रास होता कामा नये, असा काळजीचा सूरही पंतप्रधान मोदी यांनी हा संवाद साधत असताना लावला.

देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असतील, अशांना तत्काळ क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे. याबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनाही क्वारंटाईन केले जावे.  क्वारंटाईन  वॉर्डांची  संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याने ते वाढवावेत, अशा सूचनाही पंतप्रधानांनी केल्या.

विविध राज्यांमध्ये होणारे मजुरांचे पलायन थांबवणे गरजेचे आहे. ते होऊ नये यासाठी सर्व राज्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मजुरांसाठी निवाऱ्याची सोय करण्याबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात यावी, अशी सूचनाही मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मजुरांनी रस्त्यांवर येऊ नये, असे आवाहन मजुरांना करण्यात यावे, असेही मोदी म्हणाले.