अभिनेत्री शबाना आझमींच्या अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी केले ट्वीट

Shabana Azmi And PM Narendra Modi

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी व त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर कारने पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांना भीषण अपघाताला सामोरे जावे लागले. या अपघातात शबाना व कारचालक गंभीररित्या जखमी झाले.अपघातानंतर शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथील उपचारानंतर आझमी यांना पुढील उपचारासाठी कोकीलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

शबाना आझमी अपघातात गंभीर जखमी

शबाना आझमी यांच्या अपघातानंतर त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ‘शबाना आझमी यांच्या अपघाताचं वृत्त वेदनादायी आहे. त्या लवकर बऱ्या होण्यासाठी मी प्रार्थना करतो,’ असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच शबाना आझमी यांची प्रकृती ठीक होण्यासाठी देशभरातील मान्यवरांनी प्रार्थना केली आहे. ‘शबाना आझमी यांचा अपघात झाल्याचं कळाल्यानंतर वाईट वाटलं. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करते,’ असं ट्वीट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलं आहे.