
नवी दिल्ली : तब्बल सव्वादोन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर आता केंद्र सरकारने देशातील नागरिकांवर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद
“मी गेल्या वेळी मन की बातच्या माध्यमातून जेव्हा संवाद साधला होता, तेव्हा देशातील बहुतांश व्यवहार बंद होते. पॅसेंजर आणि इतर रेल्वे ट्रेन बंद होत्या. मात्र, आता भरपूर काही सुरु झालं आहे. देशात स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु आहेत. याशिवाय इतर स्पेशल ट्रेनही सुरु करण्यात आल्या आहेत. सर्व खबरदारी घेऊन ट्रेन सुरु झाल्या आहेत. विमान सेवा सुरु झाली आहे. हळूहळू उद्योगधंदेही सुरु होत आहेत. याचा अर्थ असा की, आता देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा एकदा फिरू लागले आहेत. अनलॉक-१ च्या काळात आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आता सहा फुटांचे अंतर आणि मास्क परिधान करणे गरजेचे आहे.
“आपली लोकसंख्या जगभरातील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आपल्या देशामध्ये आव्हानंदेखील भिन्न स्वरुपाचे आहेत. तरीही इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना तितक्या वेगाने पसरु शकला नाही. कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील आपल्या देशात कमी आहे. जे नुकसान झालं आहे, त्याचं दु:ख आपल्या सगळ्यांना आहे.”
“ही सर्व लढाई देशातील नागरिकांच्या संकल्पनेमुळेच लढली जात आहे. नागरिकांच्या संकल्पना शक्तीसोबतच आणखी एक शक्ती ताकदवान शक्ती या लढाईत महत्त्वाची ठरत आहे. ती शक्ती म्हणजे देशवासियांची सेवा शक्ती आहे. सद्यस्थितीत महामारीच्या संकंटात आपण दाखवून दिलं आहे की, सेवा आणि त्याग आमचा विचार फक्त आमचा आदर्शच नाही तर भारताची जीवनपद्धत आहे.”
“‘सेवा परमो धर्म’, असं आपल्याकडे म्हटलं जातं. सेवेतच सुख आहे. दुसऱ्याच्या सेवेत लागलेल्या व्यक्तीत कुणत्याही प्रकारचे नैराश्य किंवा यातना नसते. अशा व्यक्तीच्या जीवनात आणि त्याच्या दृष्टीकोनात नेहमी आत्मविश्वास दिसतो. या व्यक्तीमध्ये नेहमी सकारात्मकता दिसते. आपले डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सफाईकामगार, मीडिया कर्मचारी हे सर्व सेवा करत आहे.”
आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या राजेंद्र जाधव या शेतकऱ्याचा उल्लेख केला. नाशिकच्या सटाणा येथील राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरच्या मदतीनं सॅनिटायझेशन मशीनची निर्मिती केली आहे. आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी स्व खर्चातून सॅनिटायझेशन मशीन बनवली आहे. याबाबत मोदी यांनी जाधव यांचं कौतुक केलं. भारतात कोरोनाविरोधात सर्वजण प्रयत्न करत आहेत. देशातील वेगवेगळ्या भागात लोक स्वतःला सेवेत वाहून घेत आहेत. जे या कामात स्वतःला गुंतवून ठेवत आहेत. त्यांना कसलाही दुसरा विचार सतावत नाही. वेळेमुळे अनेक संस्था, व्यक्ती आणि सेवा करणाऱ्यांची नाव घेऊ शकत नाही, असं मोदी म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला