काहीतरी बनायचं स्पप्न बाळगण्यापेक्षा करुन दाखवण्याचं स्वप्न बाळगा – पंतप्रधान

pm modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात संवाद साधला. देशभरातील विविध शाळांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून पंतप्रधानांनी सर्वांशी थेट संवाद साधला. प्रश्नोत्तरांच्या स्वरुपातील या संवादाच्या कार्यक्रमातून मोदींनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं रहावं याबाबत विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना होत असलेल्या तणाव हा परीक्षेचा तणाव नाही. तुमच्या मनात एक आकांक्षा असते की मला काही तरी बनायचंय त्यासाठी ही परीक्षा महत्वाची आहे. जर मी यात अयशस्वी झालो तर माझ्यासाठी पुढील दरवाजे बंद होतील, याचाच प्रामुख्याने तुम्हाला ताण असतो. आपण कधीही काहीतरी व्हायचं स्पप्न बाळगू नका, तर काहीतरी करण्याचं स्वप्न बाळगा. तेव्हाच तुम्ही जे काही कराल ते चांगलंय कराल. जर असा तुमचा दृष्टीकोन राहिला तर तुम्हाला कधीही परीक्षांचा तणाव येणार नाही. त्यामुळे इतर अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुली असतील.

पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्या पाल्याची एखादा विषय शिकण्याची किती क्षमता आहे हे तपासायला हवं. लहान असताना आपण मुलांना ज्या प्रेमाने प्रोत्साहित करीत गोष्टी शिकवत होतो. तशाच प्रकारे मुलं मोठी झाल्यानंतरही त्यांना त्याचप्रमाणे प्रेरीत करीत रहा. याला शेवटपर्यंत सोडू नका. पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांवर दबाव न टाकता प्रोत्साहीत केलं पाहिजे.

दिवसभर थकल्यानंतर जर रात्री जागून तुम्ही अभ्यासासाठी बसला तर तुमचे मन स्थिर राहणार नाही. मात्र, चांगली झोप घेतल्यानंतर तुम्ही सुर्वोदयापूर्वी तयार होऊन अभ्यासासाठी बसलात तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र, तुम्ही रात्री किंवा सकाळी अभ्यास करता हे महत्वाचं नाही. उलट आपल्याला ज्या वेळेत योग्य वाटतं त्या वेळेत अभ्यास करावा, असा सल्ला मोदींनी विद्यार्थाना दिला .