भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान

PM Modi,corona-vaccination-campaign

नवी दिल्ली :- भारतात अखेर लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते लसीकरणाच्या मोहिमेचा (corona-vaccination-campaign) शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी लसी निर्मितीच्या यशासाठी देशवासीयांचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर करोना काळात भारतीयांनी अनुभवलेल्या वेदनांनाही फुंकर घातली. करोनामुळे (Corona) मृत्यू झालेल्या कोविड योद्धे आणि नागरिकांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांचा कंठ दाटून आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनाच का लस दिली जात आहे, याचं कारण सांगितलं. प्रत्येक रुग्णाला वाचवण्याच्या प्रयत्नात काही डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातील काहींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसऱ्याला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना म्हणाले की, या दिवसाची संपूर्ण देशवासियांनी वाट पाहिली. कोरोनाची लस कधी येणार हा प्रत्येक देशवासियांना प्रश्न पडला होता. आजपासून भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु होईल. मी सर्व देशवासियांना यासाठी शुभेच्छा देतो. आज ते शास्त्रज्ञ, लसीशी निगडीत लोक कौतुकास पात्र आहेत. त्यांनी कुठला सण पाहिला नाही. ना रात्र पाहिली ना दिवस. लस निर्माण होण्यास अनेक वर्ष लागतात. पण भारतात खूप कमी काळात दोन लसींची निर्मिती करण्यात आली आहे. अजून काही लसींचं संशोधन सुरु आहे. हे भारताचं मोठं यश म्हणावं लागेल, अशा शब्दात मोदी यांनी लस निर्मीतीच्या कार्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं.

भारताची लसीकरण मोहीम मानवीय आणि महत्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्याला सर्वाधिक गरज आहे, जो कोरोना रुग्णांशी थेट संपर्कात आहे त्याला सुरुवातीला लस दिली जाणार आहे. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार. त्यानंतर देशाची रक्षा, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, सफाई कर्मचारी आदींना लस दिली जाणार आहे. त्या सर्वांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करेल. या लसीकरणाच्या तयारीसाठी राज्य सरकारांच्या सहकार्यानं ट्रायल्स, ड्राय रन केलं आहे. असंही मोदी म्हणाले.

सर्व देशवासियांना पुन्हा सांगू इच्छितो की, कोरोना लसीचे दोन डोस घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक डोस घेतल्यानंतर दुसरी लस घेण्यास विसरलो असं चालणार नाही. एक लस घेतल्यानंतर पुढे महिन्याभरानंतर दुसरी लस घेणं गरजेचं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 14 दिवसानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतील. त्यामुळे लस घेतल्यानंतर लगेच बेजबाबदारपणे वागू नका. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन सुरु ठेवा, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केलं आहे.

भारत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच 3 कोटी लोकांना लस देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आलल्याला ही मोहीम 30 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि गरज असलेल्या लोकांनाच लस दिली जाणार आहे. भारताची लसीकरण मोहीम खूप मोही आहे. त्यामुळे ही मोहीम म्हणजे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन म्हणावी लागेल. आपले शास्त्रज्ञांनी दोन्ही भारतीय बनावटीच्या लसीबाबत खात्री पटल्यानंतरच आपत्कालीन लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील 60 टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह आहे.

आम्ही दुसऱ्यांच्या कामी आलो, हा निस्वार्थ भाव आपल्या मनात असला पाहिजे. आज आम्ही गेल्या वर्षाकडे पाहिलं तर एक राष्ट्र म्हणून आम्ही खूप शिकलो आहोत. घरातील एखादा व्यक्ती आजारी असेल तर संपूर्ण कुटुंब त्याची सुश्रृषा करतं. पण कोरोनाने आजारी व्यक्तीलाच एकटं पाडलं. अनेक लहान बाळं आईविना रुग्णालयात उपचार घेत होते. अनेक वृद्ध नागरिक आपल्या कुटुंबाविना अनेक दिवस रुग्णालयात होते. कोरोनामुळे मृत्य पावलेल्या लोकांना आपल्या कुटुंबातील कुणी पाहू शकला नाही. कोरोनामुळे समाजात एकप्रकारचं नैराश्य पसरलं होतं. पण नैराश्याच्या या वातावरणात कुणीतरी आशा जागृत करण्याचा प्रयत्न करत होतो. अशावेळी काही लोक आपल्यासाठी त्यांचं आयुष्य संकटात टाकत होते. डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. त्यांनी अनेक दिवस आपल्या मुला-बाळांना नातेवाईकांना पाहिलं नाही. त्यातील काही सहकारी तर घरी परतू शकले नाहीत. त्यांनी एक-एक जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी पहिली लस म्हणजे कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली आहे. अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी मृत पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER