पाणी जपून वापरण्याची जबाबदारी सर्वांची; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींच आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) रविवारी सकाळी ११ वाजता आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ (Mann Ki Baat) च्या ७४ व्या भागात देशाला संबोधित केले. या महिन्याच्या सुरूवातीलाच पंतप्रधानांनी देशातील लोकांना जलसंवर्धनाबाबत आवाहन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निसर्गाने पाण्याच्या रूपानं आपल्या सर्वांना एक सामूहिक भेट दिली आहे. जलसंधारणाबाबतची आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. काही दिवसात जलशक्ती मंत्रालय ‘कॅच द रेन’ ही मोहीम राबवेल. त्याचा नारा म्हणजे ‘कधीही आणि कुठेही पाऊस पडो, कॅच द रेन’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते म्हणाले की, भारताच्या बहुतांश भागामध्ये मे-जूनमध्ये पावसाला प्रारंभ होतो. आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणा-या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वजण आत्तापासूनच 100 दिवसांचं एखादं अभियान सुरू करू शकतो का? जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनंही जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ ही सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाचा मूलमंत्र आहे, – ‘‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’’ या मोहिमेसाठी आपण आत्तापासूनच काम सुरू करूया, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं की, माघ पौर्णिमेला संत रविदास जी यांची जयंती असते. आजही संत रविदास जींचे शब्द, त्यांचे ज्ञान, आपल्याला मार्गदर्शन करतात.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्या प्रिय देशवासियांनो, आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ ही आहे. आजचा दिवस भारताचे महान वैज्ञानिक, डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी शोधून काढलेल्या ‘रमण इफेक्ट’ला समर्पित आहे. मोदी म्हणाले की, एक खूप चांगला संदेश मला नाशिकच्या स्नेहीलजी यांनीही पाठवला आहे. स्नेहीलजी यांनी लिहिलं आहे की, आपल्या देशात अगणित संशोधक आहेत, त्यांनी दिलेल्या योगदानाशिवाय विज्ञानामध्ये इतकी प्रगती झाली नसती. आपण भारतातल्या संशोधकांची माहितीही जाणून घेतली पाहिजे.

यावेळी कुंभ हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पाणी हे आपल्यासाठी जीवन आहे, हा विश्वास आहे आणि हा विकासाचा प्रवाह आहे. एक प्रकारे पाणी परिसापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. असे म्हणतात की परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे रुपांतर सोन्यात झाले. तसेच, जीवनासाठी पाण्याचा स्पर्श आवश्यक आहे, विकासासाठीही ते आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER