आधी पाठिंबा दिला, मग यू-टर्न का? कृषी कायद्यांवरून पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना सवाल

मुंबई :- कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन (Farmers Protest) आता पेटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली. ‘विरोधकांनी जरूर विरोध करावा, पण शेतकऱ्यांना नवीन कायद्यांबद्दल समजून सांगितले पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लगावला. तसंच, आधी पाठिंबा दिला होता, मग यू-टर्न (U turn) का ? असा सवालही मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना (Sharad Pawar) विचारला. मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना कृषी कायदे आणि आंदोलकांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले .

शेतकरी आंदोलनाची खूप चर्चा झाली आहे. कशाबद्दल हे आंदोलन आहे, त्याबद्दल चर्चा झाली नाही. शरद पवार यांनी शेती कायदे सुधार करण्यासाठी प्रयत्न केले होते. शेती कायद्यात सुधार करण्यास मत व्यक्त केले. पण त्यांनी कायद्याला विरोध केला नाही. आज आम्ही चांगले विचार मांडले याचा अर्थ असा नाही की, १० वर्षांनंतर चांगले विचार असू शकत नाही. पण अचानक आज त्यांनी यू-टर्न का घेतला हे मात्र कळू शकले नाही. तुम्ही शेतकऱ्यांनासुद्धा सांगू शकता की, नवीन कायदे आहे ते स्वीकारले पाहिजे, असा टोला मोदींनी शरद पवारांना लगावला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणातील मुद्देच राज्यसभेत वाचून दाखवले.

शेतकऱ्यांना पीक विकण्यासाठी स्वातंत्र्य, भारताला स्वतंत्र कृषी बाजार मिळवून देण्यासाठी मनमोहन सिंग यांनी सांगितले होते. आता त्यांनी जे सांगितले होते तेच आम्ही करत आहे. उलट तुम्हाला याबद्दल अभिमान वाटायला हवा होता, असा टोलाही मोदींनी लगावला. जे लोक विरोध करत आहेत, त्यांच्या राज्यात त्यांनी याच विधेयकातून काही ना काही केलेच आहे. एका घरात जेव्हा लग्न असते तेव्हा कुणी नाराज होत असते, तसंच देशसुद्धा सर्वांत  मोठे कुटुंब आहे, कुणी ना कुणी नाराज होतच राहील, अशी फटकेबाजीही मोदींनी केली.

आज जे काही माझ्याविरोधात बोलले जात होते, तेव्हासुद्धा डावे हे काँग्रेस सरकारविरोधात बोलत होते.  त्यामुळे माझ्या वाट्याला ज्या काही शिव्या येतील त्या येऊ द्या, तुम्ही श्रेय घ्या , अशी टोलेबाजीही मोदींनी केली. ‘कृषिमंत्री तोमर हे शेतकऱ्यांशी बोलत आहेत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजून कोणताही तणाव निर्माण झालेला नाही. आंदोलन करणे तुमचा हक्क आहे; पण वयोवृद्ध शेतकऱ्यांनी तिथे बसवणे योग्य नाही.

तुम्ही आंदोलन मागे घेतल्यानंतरसुद्धा चर्चा करू शकता. चर्चा करण्यासाठी मी राज्यसभेच्या माध्यमातून निमंत्रण देत आहे. चर्चेतूनच मार्ग सुटणार आहे, असे आवाहनही मोदींनी केले. तसेच एमएसपी कायम राहणार आहे. देशातील लोकांना स्वस्त धान्य दिले जात आहे, ते कायम राहणार आहे, असेही मोदींनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : ‘आंदोलनजीवी’ देशात जन्माला आली नवी जमात ! त्यांच्यापासून सावध रहा, मोदींचा सल्ला 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER