‘अमेरिकेत बायडेन-हॅरिस पर्वास आरंभ’, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

pm-modi-congratulates-us-president-biden

नवी दिल्ली : अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराचं देशभरातून स्वागत करण्यात आलं. विविध देशांच्या प्रमुखांनी बायडेन यांचं अभिनंदन केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं.

बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं. बायडेन यांचं अभिनंदन करतानाच मोदी म्हणाले, भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचं अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे. अमेरिकेचं यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी बायडेन यांच्याबरोबर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणाऱ्या कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं आहे. उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेल्या कमला हॅरिस यांचं अभिनंदन. हा ऐतिहासिक क्षण आहे. भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आशादायी आहे. भारत-अमेरिका भागीदारी विश्वासासाठी फायदेशीर आहे, असं मोदी यांनी हॅरिस यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना, तर अमेरिकी सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या लॅटिन-वंशीय न्यायमूर्ती सोनिया सोटोमायर यांनी कमला हॅरिस यांना शपथ दिली. ७८ वर्षांचे बायडेन हे अमेरिकेचे आजवरचे सर्वात वयोवृद्ध नवनियुक्त अध्यक्ष ठरले. तर ५६ वर्षीय कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला, तसेच आफ्रिकी-भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष ठरल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER