नवीन वर्षात पंतप्रधान मोदींचे वैज्ञानिकांना ‘हे’ आवाहन

PM Modi

बंगळुरू : ग्रामीण भागाच्या विकासासाठी तंत्रज्ञान विकसित करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी वैज्ञानिकांना केले आहे. इंडियन सायन्स काँग्रेसचे १०७ वे अधिवेशन आज शुक्रवारपासून बंगळुरू येथे सुरू झाले. ७ जानेवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

‘ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही या वर्षीच्या अधिवेशनाची संकल्पना आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, वैज्ञानिकांनी लावलेले शोध लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. संपर्क तंत्रज्ञानाच्या शोधाने मोबाईलची सेवा सर्वसामान्यांना खुली झाली असून, नागरिक एकमेकांसोबत जोडले गेले आहेत.

आता, ग्रामीण भागाशी संबंधित तंत्रज्ञान विकासावर वैज्ञानिकांनी भर देण्याची गरज आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानातील प्रगती आवश्यक असून कृषी, आरोग्य, दळणवळण, सरकारी योजना, पर्यावरण, उद्योग या सर्व क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा विकास महत्त्वाचा आहे. नव्या भारताकडे वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे. तोच देशाला दिशा देईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.