आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान मोदी आणि शहांचे चक्क मराठीतून ट्विट

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकरी परंपरेच्या इतिहासाला उजाळा दिला असून वारकऱ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी चक्क मराठीतून ट्विट केले आहे. शिवाय, गृहमंत्री अमित शहा यांनीही मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. “आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस.

संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी रहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी!” असं ट्विट करत मोदी यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमित शहा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आषाढी एकादशीनिमित्त समस्त वारकरी बंधू-भगिनींना शुभेच्छा! महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे; आणि सर्व संतांना प्रिय असलेले पवित्र निर्मळ तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरी व श्रद्धास्थान म्हणजे पंढरीचा विठोबा ! “सकळ देवांचे माहेर । सकळ संतांचे निजमंदिर। ते हे पंढरपूर जाणावे।।” तसंच, ते पुढे म्हणतात की, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यासारख्या संतांनी विषमतेच्या भिंती दूर सारून समाजात समानता आणि सलोखा निर्माण केला. अशा सर्व महान संतांना कोटी कोटी नमन! जय जय पांडुरंग हरी! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!- असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER