प्लीज, घरातच राहा किमान १ मेपर्यंत !

Lockdown - Coronavirus - Editorial

Shailendra Paranjapeराज्य सरकारने तथाकथित कडक निर्बंध लागू करताना अभूतपूर्व गोंधळाचे दर्शन घडवलेले आहेच. त्यामुळे भाजी खरेदी, दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी आणि दूधदुभते, दही अशा रोजच्या लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या खरेदीच्या नावाने रिकाम्या पिशव्या घेऊन उत्साही नागरिकांनी अनेक शहरांमध्ये तथाकथित लॉकडाऊनचा फज्जा उडवलाय. त्याबद्दलच्या सचित्र बातम्या बहुतांश वृत्तपत्रांतून छापून आल्यात. वास्तविक १५ दिवसांचा प्रश्न आहे आणि लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधही राज्य सरकारने पाच- सहा दिवसांच्या अनाठायी चर्चेच्या गुऱ्हाळातनंतर लागू केले आहेत. त्यामुळे नागरिकांना पंधरवड्यासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यासाठी खरे तर पुरेसा अवधी मिळालेला होता. तरीही तथाकथित लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू करताना धरसोड वृत्तीचे दर्शन सरकारने घडवले आहे. त्याचा फटका सर्वच शहरांमध्ये बसताना दिसतोय आणि नागरिक काही ना काही कारण सांगत रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या बॉडीलँग्वेजमधून आत्मविश्वास व्यक्त होत नसल्याने त्यांच्या फेसबुक लाइव्हनंतर दरवेळी त्यांना ट्रोल केलं जातंय, हे आपण सर्वांनी गेले वर्षभराहून जास्ती काळ पाहिलं आहे. पण परवाच्या त्यांच्या फेसबुक लाइव्हनंतर तर सोशल मीडियावरून त्यांना ट्रोल करायचाही आता कंटाळा येतोय, अशा प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या दिसताहेत. त्यामुळे राज्याचे नेतृत्व खंबीर, कणखर आणि ठामपणे निर्णय घेणारे नसले की सर्वच निर्णयांमध्ये धरसोड वृत्ती दिसून येते आणि त्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे तीन पायांचे असल्याने सर्व गणिती नियमांना धुडकावून लावत ते अस्थिर असल्याचेच दिवसागणिक सिद्ध करत आहे. वास्तविक, तीन बिंदू जोडले गेले की गणितीय रचनेत स्थिरता प्राप्त होते; पण हे तिरपागडे सरकार ठरावीक काळानंतर अस्थिर असल्याचे लोकांसमोर येत आहे.

कोरोनासारख्या संकटाचा सामना करताना पुण्यामध्ये काल गुरुवारी कोरोनाने (Corona) मरण पावलेल्यांचा आकडा शंभराच्या वर गेलाय. अर्थात हा आकडा जिल्ह्याचा असल्याने केवळ पुणे शहरापुरता नाही; पण तरीही गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिवसात ९९ मृत्यू, हा सर्वाधिक आकडा होता. तो कालच्या मृत्युसंख्येने पार केला आहे आणि ही पुण्यासाठी चिंतेची बाब आहे. त्यात काल दिवसभरात कोरोनाचे पाच हजार रुग्ण आढळले आहेत. आशेचा किरण असा आहे की बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे.

मुळात आपल्याला कोरोना झालाय की नाही, याची खात्री पटवून घेण्यासाठी उपलब्ध असलेली आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाचीही आता कमतरता भासू लागलीय. अगदी खासगी प्रयोगशाळांमधूनही चाचणी केल्यानंतर २४ तासांत रुग्णाचा अहवाल येणं अवघड होऊ लागलंय. त्यामुळे दोन किंवा तीन दिवसांनी आपण कोरोनाबाधित आहोत हे समजेपर्यंत अशी माणसं समाजात फिरताहेत आणि कोरोना पसरवताहेत. त्यामुळेही रुग्णसंख्या वाढीस लागत आहे. त्या दृष्टीने सरकार स्थिर असो वा नसो, राज्याचे नेतृत्व खंबीर असो वा नसो, पण एकदा सरकारने निर्बंध लागू केल्यानंतर ते आपण सर्वांनी पाळायला हवेत; कारण हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा नव्हे तर सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न आहे.

त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडायला हवे. कोरोना निर्बंधात घराजवळचे रस्ते कसे दिसतात, बंद दुकाने कशी दिसतात, रिकाम्या रस्त्याचे फोटो व्हाट्स अपवर टाकून खूप लाइक्स मिळवायचे, हे सारे प्रकार बंद करायला हवेत. पुणेकर जिज्ञासू आहेत, कोणत्याही गोष्टीवर वा निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावायचा त्यांचा अधिकारही आहे. तसेच डावे-उजवे, मध्यममार्गी किंवा कोणतीही विचारधारा न मानणारे अशा सर्वांवर यथेच्छ टीका करण्याचा पुणेकरांचा अधिकारही यावच्चंद्रदिवाकरौ सुरक्षित राहणार आहे; पण सध्या कोरोना नावाचा निर्जीव पण भयानक विषाणू पुण्यातही धुमाकूळ घालतोय, याचे भानही या सर्व अधिकारांबरोबरच ठेवायची गरज आहे. ते भान ठेवून १५ दिवसांची कळ काढा आणि १ मे २०२१ महाराष्ट्रदिनापर्यंत आपापल्या घरात सुरक्षित राहा म्हणजे मग महाराष्ट्रदिन, कामगारदिन असं सारं साजर करता येईल, इतकीच सर्वांना विनंती.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button