कृपा करा, फॉरवर्डू नका, तज्ज्ञ बनू नका….

Covid - Maharashtra Today

Shailendra Paranjapeकरोनाचा विषाणू वैज्ञानिकांनाही पूर्णपणे समजलेला नाही. त्यामुळे समुद्रात पाण्यात असताना मोठी लाट आली की काय करायचे तर शांतपणे खाली वाकून तिला शरण जायचे. समुद्राची ताकद अमर्याद असते आणि त्या तुलनेत एखाद्या रोगाची साथ तितकीशी मोठी नसते. मनुष्यप्राण्याला त्याच्या अस्तित्वापासून भीत असते ती अज्ञाताची आणि करोनाचा विषाणू न समजणं, हा मोठा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जसजशी त्याबद्दलची माहिती जगभरातून वैज्ञानिकांकडून येईल तसतसे आपण उचलत असलेल्या पावलांमधेही बदल करणं शहाणपणाचं असतं.

करोनाची साथ आल्यावर लॉकडऊन, कडक उपाययोजना, निर्बंध हो सारं अमलात आणताना साथरोग नियंत्रण कायद्यातल्या तरतुदींचा वापर केला जातो. साथरोग आहे याचा अर्थ जणू युद्धजन्य स्थिती आहे, असं मानलं जातं. अशा स्थितीत सामान्यपणे आपल्या अवतीभोवती लोकशाहीत सत्तेवर असलेल्या सरकारनं केलेल्या उपाययोजनांचे पालन करणं, हे नागरिकांसाठी आवश्यक ठरतं. किंबुना, हे त्यांचं कर्तव्यच असतं. स्थानिक पातळीवर महापालिका, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांना किंवा या विविध पातळ्यांवरच्या प्रशासन व्यवस्थांनी घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणं तितकंसं शहाणपणाचं नाही. सरकारवर टीका करायला हरकत नाही आणि जबाबदार नागरिकांनी तार्किक प्रश्न उपस्थित करणं, हे त्यांचं कर्तव्यही आहे. पण मुळात, शासन व्यवस्था, निर्णय प्रक्रिया यांची कोणतीही माहिती नसताना उठसूट हातातल्या मोबाइलवरून कोणत्याही पातळीवरच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयांवर टीका करणं, प्रश्नचिन्ह लावणं, हे तितकंसं योग्य नाही.

करोना आला आणि पाठोपाठ रेमडिसिव्हर, प्राणवायू यासंदर्भात समस्या आल्या. आता म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारामुळे डोळा गमवाव्या लागलेल्या रुग्णांमधे तसंच अगदी जीव गमवावा लागलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने म्यूकरमायकोसिस आजाराच्या इंजेक्शनच्या किमती रुग्णांना परवडतील, अशा राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत. रेमडिसिव्हर, प्राणवायूपाठोपाठ आता म्यूकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वणवण करावी लागतेय. या इंजेक्शन्सचा काळाबाजार रोखण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी १९ भरारी पथके स्थापन केली आहेत. वास्तविक, आपल्याकडे मूळ समस्या आर्थिक स्थितीची आहे आणि महापालिका असो की राज्य सरकार पैशाचं सोंग आणणं हे कुणालाच शक्य नसतं. त्यामुळे औषधांचा तुटवडा, काळा बाजार असो की त्यातले विविध गैरप्रकार विविध पातळ्यांवरची सरकारं वरातीमागून घोडं, अशा प्रकारे उपाययोजना करताना दिसतात.

प्लाझ्माचा रुग्णांना उपयोग होतो, असं आधी सांगितलं गेलं आणि सामान्य माणसाचा प्लाझ्मा पाचशे साडेपाचशे रुपयांना तर करोनामुक्त झालेल्यांचा प्लाझ्मा पाच हजार रुपयांना विकला गेला. आता राज्याच्या करोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी आणि नंतर केंद्र सरकारनंही हे स्पष्ट केलंय की प्लाझ्माच्या उपचारांचा करोना रुग्णांसाठी काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे जसजशी करोनासंदर्भातली ताजी माहिती उपलब्ध होईल, तसतसे उपचार आणि करोना व्यवस्थापनात बदल करावे लागतील. पण प्रत्येक वेळी शब्दच्छल करून आणि या बघा सरकारी विसंगती अशी प्रकारच्या पोस्ट व्हाट्स अपवर टाकून आपापली विद्वत्ता दाखवण्याचं सर्वच आभासी तज्ज्ञांनी थांबवायला हवं. दुसरं म्हणजे करोनाची युद्धजन्य स्थिती असल्याने रोजच्या रोज त्या त्या पातळीवरच्या सरकारी यंत्रणांचे आदेशच मानायला हवेत. त्याबरोबरच समुद्रातली मोठी लाट आल्यावर खाली वाकणं, ही वैयक्तिक पूर्वकाळजी घेणं आवश्यक असतं तसंच करोना काळात आणि त्याचं पूर्ण उच्चाटन होईपर्यंत सरकार सांगत नाही तोवर मास्क, सँनेटायझर आणि सोशल डिस्टन्स पाळायलाच हवं.

समुद्राची भरती ओहोटी बघूनच समुद्रात जायला हवं तसंच करोनाच्या लाटेची माहिती जगभरातून आणि आपल्या त्या त्या पातळीच्या सरकारी यंत्रणांकडून येईल, त्यानुसार करोना सुसंगत वर्तन करायला हवे. व्हाट्स अप विद्यापीठातले बेसुमार प्रमाणात वाढलेले तज्ज्ञ, विविध प्रकारची प्रसारमाध्यमे आणि यात मी लिहितोय त्याचाही समावेश आहे, यांची माहिती तपासून घ्यायला हवी. ती क्षमता नसेल तर फक्त आणि फक्त सरकारी माहितीवर विश्वास ठेवावा. आपल्या आवडत्या नावडत्या नेत्यांच्या विधानांचा अर्थ आपल्या सोयीप्रमाणे न लावता करोना काळात मी माझा जीव सुरक्षित राहील, हे पाहीन इतकीच प्राथमिकता ठेवावी आणि कोणत्याही पोस्ट फारवर्डताना दहा वेळा विचार करावा किंवा चोवीस तास थांबावे. आपण जगाला फार काही महत्त्वाची माहिती फॉरवर्डमधून देऊ शकत नाही, याची खूणगाठ मनाशी बांधावी. तर आणि तरंच करोनाशी सुरू असलेला लढ जिंकण्यासाठी शहराला, राज्याला आणि देशाला तसंच जगालाही आपण सहाय्यभूत ठरू.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button