‘त्याने’ खेळले 108 चेंडू पण धावा केल्या फक्त 7 !

Felix organ

इंग्लंडमधील साउथम्पटन येथील काउंटी सामन्यात (County Cricket) हॅम्पशायरचा (Hampshire) फलंदाज फेलिक्स ऑर्गन (Felix organ) याने रविवारी शतक साजरे केले आणि उपस्थित मोजक्या लोकांनी त्याच्यासाठी अभिनंदनपर टाळ्या वाजवल्या पण फेलिक्सचे हे शतक वेगळे होते. हे शतक धावांचे नव्हते तर चेंडू खेळून काढायचे होते. या अनोख्या खेळीत फेलिक्सने 108 चेंडू खेळून 134 मिनिटात फक्त 7 धावा केल्या. सॉमरसेटविरुध्द त्याने हा पराक्रम केला.

क्रिकेटचे हे वेगळेच रुप आहे. एकीकडे 17 आणि 18 चेंडूत अर्धशतकांच्या खेळी होतात. सहा चेंडूंवर सहा चौकार किंवा सहा षटकार लागतात आणि दुसरीकडे या गड्याने तब्बल 108 चेंडू खेळले पण धावा फक्त सात केल्या.

प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांच्या चेंडूनिहाय खेळींच्या नोंदी फार पूर्वीपासून उपलब्ध नाहीत पण 1997 पासून काउंटी चॕम्पियनशीपसाठी या नोंदी उपलब्ध आहेत आणि तेंव्हापासूनची ही काउंटी क्रिकेटमधील सर्वात संथ खेळी आहे. याच्याआधी 2005 मध्ये डर्बीशायरच्या मोहम्मद शेखने नॉर्दम्पटनशायरविरुध्द 104 चेंडूत 8 धावा केल्या होत्या. पण फेलिक्सने त्याच्यापेक्षाही गोगलगाय खेळी करत 108 चेंडूत फक्त सात धावा केल्या आणि तो ओव्हरटनच्या गोलंदाजीवर डेव्हीकडे झेल देऊन बाद झाला.

फेलिक्सची खेळीसुध्दा जलद वाटावी अशा आणखीही काही संथ खेळी प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात आहेत. त्यात आश्चर्य वाटेल पण बडोद्याच्या शेखर भावलाल जोशी याने तर 2005/06 मध्ये बंगालविरुध्द शंभर चेंडू खेळूनसुध्दा आपले खातेसुध्दा खोलले नव्हते आणि गंमत म्हणजे 100 चेंडू खेळूनही हा पठ्ठ्या शून्यावर नाबाद परतला होता. रेल्वेच्या पी. एस. रावतने 1999- 2000 च्या मोसमात इंदूर येथे मध्यप्रदेशविरुध्द 110 चेंडूत फक्त 2 धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button