‘खेलो इंडिया’चा निधी घटला; ‘साई’च्या निधीत वाढ

Sai & Khelo India

केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) खेळांसाठीच्या निधीत कपात केली आहे. २०२१-२२ करिता २५९६.१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम गेल्या वर्षीपेक्षा २३०.७८ कोटी रुपयांनी कमी आहे. कोविड- १९ मुळे बदललेल्या परिस्थितीचा स्पष्ट परिणाम खेळांसाठीच्या निधीवर झालेला दिसून येत आहे.

गेल्या आर्थिक वर्षात खेळांसाठी केंद्राने २८२६.९२ कोटी रुपयांची तरतूद होती. पण नंतर कोरोनामुळे हीच तरतूद घटवून १८००.१५ करण्यात आली होती. तो विचार करता यंदाची खेळांसाठीची रक्कम गतवर्षीपेक्षा ७९५.९९ कोटी रुपये अधिक आहे.

कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्यानंतर आणि बऱ्याच स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरे रद्द झाल्याने या निधीच्या विनियोगावरही परिणाम झाला होता. ऑलिम्पिकमध्ये सहभागाच्या दृष्टीने आयोजित केली जाणारी शिबिरे व स्पर्धांचा खर्च क्रीडा मंत्रालय उचलत असते. गेल्या वर्षी क्वचितच राष्ट्रीय शिबिरे झाली, स्पर्धा तर झाल्याच नाहीत आणि सोयीसुविधांचा विकास व अद्ययावत करण्यातही काहीच घडले नाही. त्यामुळे गेल्या वर्षाशी यंदाची तुलना करणे योग्य ठरणार नाही असे क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

क्रीडा क्षेत्राबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘खेलो इंडिया’च्या (Khelo India) निधीत २३२.७१ कोटींची कपात करण्यात आली आहे. क्रीडा विभागात खेलो इंडियाच्या वाट्याला सर्वाधिक कपात आली आहे. गेल्या वर्षी त्यांना ८९०.४२ कोटी रु. मंजूर करण्यात आले होते. यंदा हीच रक्कम ६५७.७१ कोटी रुपये आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (The Sports Authority of India- SAI)  १६०.४१ कोटी रुपये जादा मिळणार आहेत. ‘साई’साठीची तरतूद ६६०.४१ कोटी रुपयांची आहे. गेल्या अर्थसंकल्पात ‘साई’च्या निधीत ५०० कोटींची कपात करण्यात आली होती.

राष्ट्रीय क्रीडा महासंघांनाही ( Sports Federations NSFs) ३५कोटी रुपयांच्या वाढीव निधीसह २८० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. खेळाडूंसाठीच्या भत्त्यांची रक्कम मात्र ७० कोटी रुपयांहून कमी करत ५३ कोटी करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास निधी निम्म्याने कमी करून फक्त २५ कोटी करण्यात आला आहे. २०१० च्या राष्ट्रकुल सामने व साई (SAI) स्टेडियम्सच्या दुरुस्तीच्या निधीतही ७५ कोटी रुपयांवरून फक्त ३० कोटी रु. अशी लक्षणीय कपात करण्यात आली आहे.

खेळाडू कल्याण निधीला दरवर्षीप्रमाणे दोन कोटी रुपये मिळणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये क्रीडा सुविधांसाठी ५० कोटींचा निधी कायम ठेवण्यात आला आहे. लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेला ५५ कोटी रुपयांचा निधी कायम ठेवण्यात आला आहे तर जागतिक अँटी डोपिंग संस्था (WADA) साठी निधी ५० लाखांनी वाढवून अडीच कोटी करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER