प्लास्टिकबंदी ‘ऑन पेपर’ नाही! २६ जानेवारीपासून पर्यावरण खात्याची कारवाई

मुंबई :- प्लास्टिकबंदी केवळ ‘ऑन पेपर’ राहणार नसून, येत्या २६ जानेवारीपासून, प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास पर्यावरण खात्यातर्फे कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासह देशभरात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीबाबत टाळाटाळ होत असल्याचे चित्र सध्या आहे. प्लास्टिक कॅरी बॅग आणि एकवेळ वापराच्या प्लास्टिकबाबत हे चित्र आढळून येते. अनेक ठिकाणी केवळ तक्रारींच्या आधारेच कारवाई होत आहे; मात्र, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागानेही यास दुजोरा दिला आहे.

ही बातमी पण वाचा : आदित्य ठाकरेंचे स्वप्न पूर्ण होणार

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विभागाच्या बैठकीत प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीबाबत नुकताच आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना २६ जानेवारीपासून कारवाईचे निर्देश दिलेत. याबाबतचे वृत्त आज मंगळवारी एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल दिग्गीकर यांनीही सदर वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, कारवाईपूर्वी जनजागृती करण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केले आहे.