वनस्पतींचे रस – अनेक व्याधींवर औषध चिकित्सा !

Plant Juice

आयुर्वेदात विविध स्वरूपात औषधी निर्माण सांगितले आहेत. कुठे स्वरस कुठे काढा तर कुठे वटीगुटी तर कुठे चूर्ण या सर्वांचा उपयोग व्याधी, रुग्ण वय, बल, पाचन शक्ति यानुसार केला जातो. काही औषध स्वरस रुपात प्रभावी ठरतात तर काही काढा स्वरूपात. लहानपणापासून आपण घरात बघतोच थोडा सर्दी खोकला जर झाला तर आजी आल्याचा रस मध चाटण घ्यायला सांगायची किंवा ऊन लागले हातपाय गरम पडले की लगेच कांद्याचा रस लावल्या जातो. अम्लपित्ताचा त्रास होत असेल तर डाळींबाचा रस उपयोगी ठरतो. अगदी कमी प्रमाणात सुद्धा हे वनस्पतींचे रस प्रभावी कार्य करतात.

यन्त्र निष्पीडिताद्द्रव्याद्रसः स्वरस उच्यते । किंवा स्वो रसः स्वरसः । वनस्पतींचा रस म्हणजे स्वरस ! स्वरस हा ताज्या ओल्या वनस्पतींचा काढला जातो. स्वच्छ किड नसलेल्या ओल्या वनस्पती घेऊन त्यांना यंत्रात वा खरलात कुटून कपड्यात बांधून पिळल्यावर जो रस निघतो त्याला स्वरस म्हणतात. स्वरस पान, फुले, कंद, फळ, ताज्या हिरव्या फांद्या यापासून निघू शकतो. प्रत्येक औषधींचे व्याधीनुसार प्रयोज्यांग विचार करून हा स्वरस काढतात.

  • स्वरस पचायला जड आणि प्रभावी असतो त्यामुळे कमी मात्रेत दिला जातो. अगदी १० ते १२ मिली तो प्रभावी ठरतो. अशा पद्धतीने काढलेला रस मात्र ताजाच असावा. लगेच घेतल्यास फायदा करणारा असतो. काही औषधांचे अनुपान म्हणून वैद्य असा स्वरस करून घ्यायला सांगतात. याचा अनुभव अनेकांनी घेतला असेलच.
  • आल्याचा रस व मध प्रतिश्याय, खोकला, दमा यांना कमी करणारा आहे. या व्याधींच्या औषधासह आल्याचा रस मध हे अनुपान उपयोगी ठरते.
  • लिंबू, आल्याचा रस, सैंधव हे मिश्रण भूक न लागणे, अजीर्ण, पोट फुगणे अशा पाचनाच्या तक्रारी दूर करणारे आहे.
  • तुलसीपत्र स्वरस आणि मरीच चूर्ण हे विषमज्वर, कफविकार कमी करणारे आहे.
  • गुळवेल स्वरस ज्वरहर, रसायन कर्म करणारा आहे. आवळा स्वरस वयस्थापन, रसायन गुणाचा आहे.

असे हे स्वरस, व्याधीचा रुग्णाचा विचार त्याचे बल आवड बघून दिले जाते. काही रुग्ण वास किंवा चव बघून मळमळ होते असे म्हणतात त्यानुसार बदल करावा लागतो. आयुर्वेदाचे (Ayurveda) औषध निर्माण रुग्ण, वनस्पती द्रव्य, व्याधी यांचा सर्वतोपरी विचार करून केला आहे हे नक्कीच.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button