वनस्पती परिचय – विडंग – कृमीहर श्रेष्ठ द्रव्य!

Wormwood - Maharastra Today

विडंग किंवा वावडिंग या वनस्पतीचा परिचय नसला तरी वावडिंग फळ नक्कीच ओळखीचे असते. वावडिंगाला कृमिघ्न, जंतुनाशन कृमिहा जंतुघ्नी, कृमिजित् असे पर्याय आले आहेत. या नावांवरून लक्षात येईल की कृमि किंवा जंतांवर प्रभावी हे औषध आहे. वावडिंग इतरही अनेक व्याधीनाशक कार्य करते ते बघूया.

वावडिंग कडू रसाचे उष्ण तीक्ष्ण आहे. याचे फळ औषधी प्रयोगार्थ वापरतात. वावडिंग फळ मिऱ्याप्रमाणे दिसते. थोडे तांबूस काळे करड्या वर्णाचे बी असतात त्यावर पांढरे ठिपके दिसतात म्हणून चित्रतण्डूल हे देखील पर्यायी नाव विडंगाला आले आहे. हे उत्तम जंतुघ्न असल्यामुळे कृमिदंत दंतशूल या दंतविकारात विडंग काढ्याने गुळण्या केल्यास उपशय मिळतो.

कृमि किंवा जंताचा त्रास लहान वा मोठ्या मुलांमधे आढळून येतो. भूक न लागणे, भरपूर आहार सेवन असूनही वजन न वाढणे, त्वचेवर पांढरे चट्टे येणे, दात चावणे, शय्यामूत्रता अशी अनेक लक्षणे जंत असल्यास दिसून येतात. अशावेळी विडंगाचे चूर्ण उत्तम कार्य करते. गण्डूपद कृमी सूत्रकृमी स्फीत कृमी विकारांमधे विडंग चूर्ण रिकाम्या पोटी देऊन रात्री झोपतांना पोट साफ करण्याचे औषध वा एरंडतेल दिल्यास कृमी मलावाटे शरीराबाहेर पडतात. वारंवार कृमी न होण्याकरीता विडंग चूर्ण किंवा काढा काही दिल्यास फायदा होतो. विडंग व ओवा यांचे चूर्ण गरम पाण्यासह दिल्याने कृमीनाशन कार्य होते.

त्वचा विकारांवर विडंगाचा उपयोग करतात. कृमिजन्य त्वकविकारांवर इतर औषधांसह विडंगाचा उपयोग होतो. रक्त शुद्धीकर, कृमिहर, वर्ण्य या गुणांमुळे विडंगाचा सर्व त्वचाविकारांमधे उपयोग केल्या जातो. विडंग चूर्ण गोमूत्रात वाटून लेप लावल्या जातो.

प्रसुतीनंतर वावडिंग उकळलेल पाणी बाळंतीणीला दिल्या जाते. यामुळे वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. आहाराचे पाचन होते. पोट फुगणे, उदरशूल होत नाही. मस्तिष्क रोगांवर देखील विडंग उपयोगी आहे. असे हे कृमिहर द्रव्यांमधे श्रेष्ठ विडंग.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER