कराचीत विमान कोसळले; सर्व ९८ प्रवासी ठार झाल्याची भीती

Pakistan Plane Crash

कराची : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान कराची विमानतळाजवळील निवासी भागात कोसळले. या विमानात प्रवासी व विमान कर्मचाऱ्यांसह ९८ प्रवासी असल्याची माहिती आहे. सर्व प्रवासी ९८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

विमानाचे लँडिग गिअर सुरू न झाल्यानं अपघात झाल्याची माहिती काही स्थानिक माध्यमांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका इमारतीजवळ धुराचे लोळ उठले असल्याचे दिसत आहे. या विमानात पाकिस्तानी अभिनेत्री आपल्या पतीसोबत प्रवास करत होती, अशी चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

विमानाचा अपघात निवासी भागात झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. विमान घरांवर कोसळल्यानंतर स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. परिसरात प्रचंड धूर झाला होता. १०-१२ घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान कोसळलेल्या ठिकाणी जाण्यासाठी अरुंद गल्लीमधून रस्ता असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना मदत कामात अडचण येत होती. लॉकडाऊननंतर दोनच दिवसांपूर्वी विमान वाहतूक सुरू करण्यात आली होती, हे उल्लेखनीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER