महानगरीची चित्तचित्रे

Pune

नुकतेच सानवीचे लग्न पुण्यात करायचे ठरले .कारण मुलाकडच्या मंडळींची तशी मागणी होती. त्यामुळे मग आपल्याकडचे पुण्यात स्थाईक झालेल्या नातेवाईकांची गणती सुरू झाली आणि लक्षात आलं की सगळ्या बहीण-भावंडांची मुले पुण्यात स्थायिक झालेली आहे. एकूणच या महानगरांची ओढ आणि क्रेझ वाढते आहे. किती पसरत य पुणं !आणि मुंबईची तर बातच न्यारी .नशीब आजमवायला कित्येक स्वप्नांना घेऊन या मुंबापुरीत येणारी मंडळी आपण पाहिली आहे. तिथे आल्यावर कित्येकांची चित्तचित्रे उजळलीही आहे. पण कित्येक जण बेघर ही झालेली, भरकटलेली ही आपण बघितलेली आहेत.

एकूणच ही मायानगरी आणि मोहनगरी आहे हेच खरं ! ब्रेनड्रेन किंवा आपल्याकडची बुद्धिमत्ता पूर्ण परदेशात जाते. परदेशाचा असलेला ओढा ही समस्या नवीन नाही .अलीकडे तर त्याचे फार गंभीर परिणाम जाणवायला लागले आहेत .आई-वडील येथे आणि मुले परदेशात हे आज या महानगरीत या प्रत्येक घरात दिसायला लागलेले आहे. त्यामुळे त्यातून निर्माण होणारे वृद्ध लोकांचे प्रश्न हा एक मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. तसेच आजकालच्या मुला सुनांच्या प्रचंड कामाचे ओझे आणि त्यात होरपळलेली वृद्ध पिढी या सगळ्याच न जाणवणार्या पण भीषण समस्या होत चाललेल्या आहेत. कष्टात दिवस काढून मुलांना इंजिनियर करून चूक केली आणि आयटी क्षेत्रात जाऊ दिलं, त्यातील गलेलठ्ठ पगार यांचा अभिमान बाळगला असं त्यांना आता वाटतेय. कारण त्यांच्या कामाचे तास ! कामाचे भयंकर स्वरूप आणि लॉकडाऊन काळामध्ये तर त्यांचे तास अमर्याद वाढलेले. त्यामुळे वृद्धांच्या छोट्यामोठ्या समस्यांसाठी त्यांना आता मुले मिळेनाशी झालेली. चुकून माकून ज्येष्ठ मंडळींपैकी एक जोडीदार लवकर सोडून गेला तर दुसऱ्याला ग्रासून उडणारा एकाकीपणा ! सगळच काही भीषण !

अशाच एका अपार्टमेंटची गोष्ट ! एक आजी ७०- ७५ वर्षांच्या. पूर्ण आयुष्य विदर्भातील एका छोट्या गावात गेलेले. स्वतः सुशिक्षित, लेक्चरर ची नोकरी केलेली आणि छोट्या-मोठ्या कला अवगत. सगळ्या विषयांची आवड .त्यामुळे जीवन समरसून जगलेलं. अचानक आजोबा एका आजाराने त्यांना सोडून गेले. स्वतः सुशिक्षित असलेल्या ,सुंदर आजी पार् कोलमडल्या. आता शहरात मुलांकडे राहतात. मुले सगळे सज्जन आणि चांगली .पण कामाने दडपलेली. आजींना त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणींना तोंड देताना त्यांना अनेक समस्या उभ्या राहतात. काका पूर्वी सगळे व्यवहार सांभाळायचे आणि मुख्य आता सगळे नेटवर व्यवहार होतात .हाताशी कोणी माणूस नाही. एवढ्या मोठ्या शहरात त्या स्वतः कुठे जाऊ शकत नाहीत. तसेही आजकाल कुठल्या ऑफिसमध्ये लवकर कामे होत नाहीत, चार चकरा माराव्या लागतात .

सतत नव्या नव्या प्रश्नांना तोंड देतांना खूप हैराण असतात त्या! पुन्हा पुढे मुलेच तारणहार, त्यांना कसे नाराज करणार? यातच गुंतून पडतात. तर दुसर्‍या एका फ्लॅटमध्ये एक आजी आजोबा राहतात. ७२ वर्षाच्या आजी आणि ७५ चे असतील आजोबा. त्यांच्याकडेही मध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडली. त्यांचे मुलगा-सून अमेरिकेत !त्यांना एक मुलगा! तिकडेच स्थायिक झालेले ! मध्यंतरी त्यांचा ५० -५२ वर्षाचा अमेरिकेतला मुलगा ब्रेन हॅमरेज ने गेला. सून तिकडे एकटी. लगेच वयस्क आजी-आजोबा तिकडे गेले. आणि सुनेचे सगळं व्यवस्थित लागी लागेपर्यंत तिकडे राहिले. आणि आता इकडे आले. पण मधल्या कोरोनाच्या काळात त्यांचेही भरपूर हाल झाले. बाहेर निघायचं नाही, शेवटी शेजारच्या आजींच्या मुलासुनेने चारही महिने त्यांचे सगळे सामान आपल्याबरोबर ऑर्डर केले.

त्याच्याच वरच्या मजल्यावर एक आजी एकट्या रहायच्या. आजोबा गेलेले. मुलगा लंडनला स्थायिक. मुलगी पुण्यातच!. पण मध्यंतरी त्या आजारी झालेल्या, त्यावेळीही त्या तिथेच त्यांच्या घरी राहिल्या. गावातल्या मुलीने एकट्या आईला आपल्या कडे नेले नाही म्हणा किंवा आजींनी हट्टीपणाने गेल्या नाहीत म्हणा. त्यांचं त्यांना माहिती ! कोरोना काळात फक्त रात्री झोपायला एक बाई कशीबशी मिळाली होती. पण दिवस भर एकट्याच असायच्या. खालच्या मजल्यावरील आजी मात्र दररोज एकदा त्यांना आवाज द्यायच्या. काय चाललंय विचारायच्या. एक दिवस सकाळी असाच आवाज द्यायला आजी गेल्या. तर फ्लॅटमध्ये शांतता ! पूर्ण शांतता ! कधीही भंग पावणारी !

फ्रेंड्स ! तर असा ,या वयोवृद्धांनी कुणाला आणि कसा आधार द्यायचा नि कसा आधार शोधायचा ? अशी ही महानगरी चित्तचित्रे, काळोखी ! अंधारलेली !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER