
पुणे : गेल्यावर्षी निवडणुकीच्या वेळी साताऱ्यात पावसात झालेली शरद पवारांची (Sharad pawar) झालेली प्रचारसभा राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक ठरली. पवारांच्या वाढदिवसानिमित्त, पवारांना आगळी भेट म्हणून त्या सभेचे चित्र ‘नव्या पालवीला जन्म घालणारा महावृक्ष’ शिर्षकाने पुण्यात नारायण पेठ येथे भिंतीवर काढण्यात आले!
१९ ऑक्टोबर २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात शरद पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरु असताना अचानक पाऊस पडू लागला. मात्र, सभा न थांबवता शरद पवारांनी पावसात भाषण केले होते. निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव करून श्रीनिवास पाटील विजयी झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी शरद पवारांनी दाखवलेल्या उत्साहाचे महाराष्ट्र आणि देशाने कौतुक केले होते.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून नारायण पेठ येथे हे चित्र रेखाटले आहे. पवारांच्या कर्तुत्वाला उल्लेखून “वाऱ्यासोबत उडून चाललेल्या पालापाचोळ्याची फिकीर नको, इथे नव्या पालवीला जन्म घालणारा महावृक्ष आहे” अशी ओळ लिहिलेल्या या चित्राचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पुणे शहर अध्यक्ष आमदार चेतन तुपे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, शिवसेना पक्ष प्रमुख संजय मोरे यांच्यासह महाविकास आघाडीतील आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला