‘ब्रह्मोस’साठी फिलीपाईन्स ठरू शकतो भारताचा पहिला खरेदीदार

philippines-likely-to-finalise-brahmos-deal

नवी दिल्ली : भारताने ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर फिलीपाईन्स हा भारताकडून ब्रह्मोस विकत घेणारा पहिला देश ठरण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही देशांत चर्चा सुरू असून २०२० पर्यंत हा करार होऊ शकतो. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.

भारत मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबाबत चर्चा करतो आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे. ब्रह्मोसच्या चाचण्यांनंतर फिलीपाईन्स त्याच्या परिणमकारक कार्यक्षमतेबाबत समाधानी आहे. तेथील लष्कराने ब्रह्मोस विकत घेण्याचे सुनिश्चित केले आहे. आता किमतीबाबत चर्चा सुरू आहे. या संरक्षण व्यवहारासाठी भारताने फिलीपाईन्सला १० कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे. पण फिलीपाईन्स स्वत: हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा विचार करत आहे. त्यासाठी पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रह्मोसच्या खरेदीसाठी तरतूद करण्याचा फिलीपाईन्सचा विचार आहे.

दरम्यान भारतीय लष्कर आणि नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर सुरू केला आहे. ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे. ब्रह्मोसचा पल्ला २९० कि. मी. असून त्यावर ३०० किलो पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात. ब्रह्मोस सध्या जगातील सर्वांत वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २.८ ते ३ पट आहे.

ते एका सेकंदात एक कि. मी. अंतर पार करते. तसेच त्याची नेम चुकण्याची शक्यता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) एक मीटरपेक्षा कमी असल्याचा दावा केला जातो (म्हणजेच त्याची अचूकता ९९.९९ टक्के आहे.). क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने ब्रह्मोस कमी उंचीवरून उडून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. तसेच मार्ग बदलून क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांपासून बचाव करून घेऊ शकते. ब्रह्मोस जमीन, पाणी तसेच हवेतून डागता येते. भारताच्या तिन्ही सेनादलांत आणि रशियाच्या सैन्यात ब्रह्मोस तैनात केले जात आहे.