परोपकारी गंपूंना मिळाली कवचकुंडले! (Good Samaritans get Protection)

motor vehicle act

Ajit Gogateआमच्या लहानपणी समाजशास्त्राच्या पुस्तकात ‘परोपकारी गंपू’वर एक धडा होता. मनाने भोळा, भाबडा असलेला हा गंपू, प्रसंगी जीव धोक्यात घालून, लोकांचे जीव वाचवायला धावायचा आणि घरी आल्यावर शिव्या खायचा! वैद्य मॅडमनी तो धडा असा काही तन्मयतेने शिकविला की  बिचार्‍या गंपूची फरफट पाहून, त्या कोवळया वयात आम्हा सर्व विद्यार्थ्यांची मने अगदी कातर झाली होती. वयं वाढली की मनं निब्बर होतात व अशा गंपूंची कींव करणे तर सोडाच पण, कदर वाटणेही बंद होते. समाज व्यक्तिंचाच बनलेला असतो व तोही कालांतराने असंवेदनशील होऊ लागतो. परंतु करुणा आणि परोपकार हे फक्त मानवीच गुण असल्याने समाजातील ‘परोपकारी गंपू’पणा पूर्णपणे कधी संपत नाही. कुठे घात-अपघात झाला की तत्परतेने मदतीला धावणारे, प्रसंगी पदरमोड करणारे व मृत वा जखमींची व्यवस्था लावण्यात, स्वत:चे काम सोडून संपूर्ण दिवस घालवणारे अनेक ‘गंपू’ तुम्हीही पाहिले असतील. पण हॉस्पिटलांकडून मिळणारी हृदयशून्य वागणूक, पोलिसांच्या चौकशीचा मागे लागणारा ससेमिरा आणि नंतर कोर्टात घालावे लागणारे खेटे यामुळे असे गंपू पश्चात्तापाने करवादून गेलले असतात!

रस्ते अपघातात खास करून डोक्याला जबर मार लागलेल्या जखमींचे प्राण वाचविण्यात किंवा त्यांना येऊ शकणारे जन्मभराचे अपंगत्व टाळण्यात अशा ‘परोपकारी गंपूं’ची भूमिका महत्वाची असते. अशा जखमींना अपघातानंतरच्या पहिल्या तासात (Golden Hour) इस्पितळात नेऊन योग्य उपचार मिळाले तर प्राण वाचण्याची शक्यता दुणावते. अपघात पूर्णपणे टाळणे अशक्य असले तरी त्यात होणारे मृत्यू शक्य तेवढे टाळणे अशा गंपूंच्या परोपकारावरच बव्हंशी अवलंबून असते. याचे भान ठेवत केंद्रीय परिवहनमंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुढाकार घेऊन मोटार वाहन कायद्यात (Motor Vehicle Act) दुरुस्ती करून घेतली. केंद्रीय कायदे मराठीत करणे शक्य नसल्याने अशा ‘परोपकारी गंपूं’ना इंग्रजीत ‘गूड समारिटन’ (Good Samaritan) असे भारदस्त तर हिंदीत ‘नेक व्यक्ती’ असे अगदीच पुळचट नाव देऊन त्यांना आणि त्यांच्या परोपकाराला कायदेशीर अधिष्ठान दिले गेले.सदहेतूने, निरीच्छ भावनेने आणि कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारी तसेच जखमींच्या वैद्यकीय तसेच अन्य मदतीसाठी धावपळ करणारी कोणीही व्यक्ती, अशी या गंपूंची व्याख्या केली गेली. तसेच या गंपूगिरीपायी त्यांना मनस्ताप व शारीरिक त्रास सोसावा लागेल असे काहीही करण्यास प्रतिबंध करण्यात आला. पण प्रतिबंध म्हणजे नेमके काय करायचे व काय करायचे नाही याचे वैधानिक (Statutary Rules)नियम करायचे राहिले होते. तशी वैधानिक नियमावली आता सरकारने असिूचित ( Gazzete Notification) केली आहे. परिणामी पोलीस, इस्पितळे तसेच न्यायालयांवर गंपूंच्या बाबतीत हे नियम पाळणे आता कायद्याने बंधनकारक झाले आहे. इतरांसाठीचे हे प्रतिबंध कायद्याने गंपूचे अधिकार  ठरले आहेत. धर्म, जात-पात, लिंग अथवा राष्ट्रीयत्वाच्या आधारे कोणताही भेदभाव न करता या अधिकारांना मान देऊन गंपूंना सन्माने वागविणे सर्व संबंधितांना सक्तीचे करण्यात आले आहे.

तर पूर्वीच्या पाठ्यपुस्तकांतून आता कायद्याच्या पुस्तकांतही स्थान मिळविलेल्या परोपकारी गंपूंचे अधिकार व त्या अनुषंगाने इतरांची बंधने काय आहेत याचा थोडक्यात आढावा घेऊ.

पोलीस व रुग्णालये:

  • अपघाताची पोलिसांना खबर देणा किंवा जखमींना इस्पितळात घेऊन येणाऱ्या ‘गंपूं’ना आणखी कशाही साठी खोळबंवून न ठेवता लगेच जाऊ देणे.
  • नाव, पत्ता अथवा ओळख यासारखी स्वत:विषयीची व्यक्तिगत माहिती देण्याची सक्ती न करणे.
  • मात्र ‘गंपू’ने स्वेच्छेने स्वत:विषयीची माहिती दिली तरी त्यास त्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (Eye Wittness) होण्यास भाग न पाडता ती बाब पूर्णपणे त्याच्या इच्छेवर सोडणे.
  • जखमींना घेऊन घेऊन येणाऱ्या गंपूंना त्यांची दाखल करण्याची प्रक्रिया करण्यासाठी धावाधाव करायला न लावणे किंवा उपचार व औषधांसाठी त्याकडे पैशाची कोणतीही मागणी न करणे.
  • गंपूची स्वत:ची तयारी असेल तर साक्षीदार होण्यास तयार असल्याचे त्याच्याकडून लिहून घेणे व त्याने केलेल्या परोपकारी कृत्याचे प्रशस्तीपत्र (Appreciation Letter) संबंधितांनी त्यांच्या लेटरपॅडवर सही-शिक्यानिशी लिहून देणे.

पोलिसी जाबजबाब व न्यायालयातील साक्ष:

  • साक्षीदार व्हायला तयार असलेल्या ‘गंपू’चे जाबजबाब, त्याचा आग्रह असेल तर पोलिसांच्या तपासी अधिकाऱ्याने त्याच्या सवडीनुसार, साध्या वेषात जाऊन, त्याच्या घरी किंवा कार्यालयात घेणे.
  • ‘गंपू’ तयार असेल तर त्याच्या सवडीनुसार पोलीस ठाण्यात जाबजबाब घेणे व ते एकाच बैठकीत संपविणे. गंपूला तपासी अधिकाऱ्याची किंवा स्थानिक भाषा येत नसेल तर जाबजबाब त्याच्या भाषेत घेण्यासाठी पोलिसांनी दुभाष्याची (Interpreter) व्यवस्था करणे.
  • न्यालयातही त्यांची साक्ष प्रतिज्ञापत्राच्या (Affidevit) स्वरूपात सादर करण्यास परवानगी देणे व कोर्टात साक्ष घ्यायची असेल तर ती ठरलेल्या एकाच दिवसात पूर्ण करणे.
  • ‘गंपू’ बराच दूरचा असल्याने त्याच्या सवडीच्या आणि सोयीच्या ठिकाणी साक्ष घेण्यात खूप वेळ जाईल व पैसा खर्च होईल आणि त्याने निष्कारण होईल असे न्यायालयास वाटत असेल तर कोर्टाकडून एखाद्या अधिकाऱ्यास ‘कमिशन’ (Court Commissioner) म्हणून त्याच्याकडे पाठवून साक्ष नोंदविणे.
  • शक्यतो ‘गंपू’ची साक्ष ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने घेणे. आता या नियमांची व अधिकारांची कायदेशीर कवचकुंडले मिळाल्याने हे ‘परोपकारी गंपू’ इच्छा असूनही ती न मारता मदतीसाठी धावून येतील आणि जास्तीत जास्त अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणे शक्य होईल, अशी आशा करू या.

अजित गोगटे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER