शरद पवारांवरील पीएच.डी. प्रदान; मात्र स्वभावाचे गूढ कायम

Sharad Pawar - Maharastra Today

पंढरपूर : शरद पवार (Sharad Pawar) हे नाव गेली पाच दशके महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात कायम चर्चेत असणारे नाव. राजकारणात काहीही उलथापालथ झाली तरी यामागे पवारांचा हात असल्याचे सांगण्यात येते. मात्र गेल्या ५० वर्षांत शरद पवारांच्या मनात नेमके काय सुरू आहे हे कोणालाच कळले नाही. त्यामुळे त्यांची अतिशय हुशार मात्र गूढ असे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे . पवार यांच्याकडून अनेक वेळा तोंडावर पडावे लागल्याचे सर्वांत जास्त दुःख भाजप (BJP) नेत्यांना असते आणि म्हणूनच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे त्यांच्यावर पीएच.डी. करण्याची इच्छा नेहमी बोलून दाखवत असतात. मात्र चंद्रकांत पाटील यांच्याआधी एका पठ्ठ्याने ही कामगिरी करून दाखवली आहे. या पठ्ठ्याला शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या “आदरणीय शरद पवार साहेब आणि महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही दलाचे शासन : एक चिकित्सक अभ्यास” या प्रबंधाला पीएच.डी. प्रदान केली आहे.

सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील डॉ. प्रा. दत्तात्रेय काळेल यांनी सहा वर्षांच्या सखोल अभ्यासातून हा शोधप्रबंध सादर केला आहे. डॉ. काळेल हे पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. या प्रबंधाबाबत आता दखल घ्यायचे कारण १९७८ साली शरद पवार यांनी महाराष्ट्रात असाच चमत्कार करून पुरोगामी लोकशाही दलाचे अर्थात पुलोदचे सरकार आणले होते आणि आज ४२ वर्षांनंतर २०२० सालीदेखील पवार यांनी असाच चमत्कार घडवत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र करीत राज्यात लोकशाही आघाडीचे सरकार आणून दाखवले आहे. हा प्रबंध लिहिताना डॉ. काळेल यांनी पवार यांचे ज्येष्ठ सहकारी गणपतराव देशमुख , एन. डी. पाटील, सुधाकरपंत परिचारक यांच्यासारख्या ज्येष्ठांसह सुप्रिया सुळे, सुनील तटकरे , रोहित पाटील यांच्यासारख्या तरुणांशीही चर्चा केली होती. यासाठी काळेल यांनी दोन वेळा थेट शरद पवार यांची भेट घेऊनही चर्चा केली आणि हा शोधप्रबंध तयार झाला.

पुलोद सरकारच्या निर्मितीबाबत अनेकांच्या मनात गैरसमज असून मी केवळ तत्कालीन परिस्थिती आणि महाराष्ट्रहिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी डॉ. काळेल यांना सांगितले होते. जे लिहिताय ते वास्तव लिहा, ज्यामुळे पुलोदबद्दल आजही काहींच्या मनात जे गैरसमज आहेत ते दूर होण्यास मदत होईल, असा सल्लादेखील पवार यांनी दिल्याचे डॉ. काळेल यांनी आवर्जून सांगितले. शरद पवार यांच्यावर पीएच.डी. करताना त्यांच्या स्वभावाचे कोणते अंतरंग उलगडले याबाबत काळेल यांना नीट सांगता येत नसले तरी जे सर्वसामान्यांना माहीत आहेत तेच स्वभावविशेष काळेल सांगतात. मात्र पवार यांच्या गूढ स्वभावाबाबत असलेले कोडे त्यांचे अंतरंग अभ्यासताना डॉ. काळेल यांनाही उलगडलेले नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा आणि इतर अभ्यासकांना पवारसाहेबांच्या या गुणांवर पीएच.डी. करायची संधी उपलब्ध झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button