भारतात कोरोनावरील लस लवकरच? फायझरने मागितली परवानगी

Covid Vaccine

कोरोनाचा जीवघेणा संसर्ग मुळापासून नष्ट करण्यासाठी सगळेच देश प्रयत्न करत आहेत. अशात काही कोरोना लसींच्या वापरास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अमेरिकन कंपनी फायझरनेदेखील भारताकडे लस विक्री व वितरणाची परवानगी मागितली आहे. फायझर इंडियाने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे संस्था (डीसीजीआय) लसीच्या वापराबाबत परवानगी मागितली आहे. असा अर्ज करणारी फायझर इंडिया पहिली औषधनिर्माण कंपनी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटन सरकारने फायझर व बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीच्या वापराला परवानगी दिली होती. त्याचबरोबर बहारिनमध्येही लस वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

त्यानंतर फायझरने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. लसीची आयात करण्याची, त्याचबरोबर देशभरात लसीची विक्री आणि वितरण करण्याची परवानगी फायझरने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे केलेल्या अर्जात मागितली आहे. नवीन औषधी व क्लिनिकल चाचणी नियम २०१९ नियमांतर्गत सध्या सुरू असलेल्या चाचण्यामधून सूट देऊन अशा प्रकारची परवानगी देण्याची विशेष तरतूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फायझर इंडियाने ४ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला आहे. या लसीचा भारतात आपातकालीन स्थितीत वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे फायझरने केल्याचे सूत्रांनी सांगितले. जगात फायझरच्या लसीचे २०२० मध्ये पाच कोटी डोस तयार केले जाणार आहेत. २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लसीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वांमध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचं सांगण्यात आलं होतं. ६५ वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER